….तर होणार हॉस्पीटल, हॉटेल्स, मॉल, शाळा, क्लासेस चालकांवर कडक कारवाई

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईन- शहर पोलिसांनी वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी एका पाठोपाठ सुधारणावादी निर्णय घेण्यास सुरूवात केली आहे. एक जानेवारीपासून हेल्मेटसक्ती करण्याची घोषणा करतानाच आता हॉस्पीटल, मॉल, हॉटेल्स, शाळा, कॉलेज. कोचिंग क्लासेस चालकांनीही त्यांच्या आवारात पार्किंगची पुरेशी व्यवस्था करावी तसेच वाहतुक सुरळीत राहाण्यासाठी वॉर्डन नेमावेत. वाहतुक कोंडीमुळे एखाद्याच्या जिवीतास धोका निर्माण झाल्यास संबधित आस्थापनांच्या प्रमुखांना जबाबदार धरून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराच वाहतूक पोलिसांनी दिला आहे.

वाहतुक पोलिस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी आज शहरातील हॉस्पीटल्स, मॉल, हॉटेल्स, मंगल कार्यालय, शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेसचे व्यवस्थापक आणि मालकांची आज बैठक घेतली. वरिल आस्थापनांच्या ठिकाणी मोठ्याप्रमाणावर नागरिकांचा वावर असतो. याठिकाणी मोठ्याप्रमाणावर दुचाकी आणि चार चाकी अस्ताव्यस्त पार्क करण्यात येत असल्याने परिसरात वाहतुकीची कोंडी होते. अनेकदा रुग्णांना घेउन जाणार्‍या रुग्णवाहीकांनाही या वाहतुक कोंडीचा फटका बसतो. यामुळे रुग्णही दगावण्याची शक्यता अधिक असते. या परिस्थितीत आपआपल्या आस्थापनांमध्ये येणार्‍या वाहनांसाठी पुरेशी पार्किंग व्यवस्था करावी. तसेच आस्थापनांच्या समोरील व आजूबाजुच्या रस्त्यांवर मोठ्याप्रमाणावर वाहने पार्क केली जातात. ही वाहने वेडीवाकडी पार्क केल्यास वाहतुकीची कोंडी होते, ही नित्याची बाब झाली आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच पार्किंगसह या आस्थापनांच्या आवारातील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी प्रत्येक संस्थेने वॉर्डनची नेमणुक करावी, अशी सूचना सातपुते यांनी उपस्थितांना केली.

वरिल आस्थापनांसमोरील वाहतुक कोंडीत अडकलेल्या रुग्णवाहीकेमध्ये एखाद्या रुग्णांचा बळी गेल्यास संबधित आस्थपनांचे मालक अथवा व्यवस्थापकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही सातपुते यांनी यावेळी दिला. सातपुते यांनी या अगोदर शहरातील शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेसचे प्राचार्य, मुख्याध्यापक आणि संचालकांचीही बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीमध्ये शाळा, महाविद्यालय आणि क्लासेसच्या ठिकाणी पुरेशी पार्कींग सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच शाळा, महाविद्यालय आणि क्लासेस सुटताना वाहतूक नियंत्रणासाठी वॉर्डन नेमण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दंड आकारणीसाठी नवीन २५० मशीन्स
नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालकांकडून दंड आकारण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून एम स्वाईप मशिन्स वापरण्यात येत होत्या. या मशिन्समध्ये बदल करण्यात आला असून ऍक्सीस बँकेने नवीन २५० अत्याधुनीक मशिन्स उपलब्ध करून दिल्या आहेत. या ऍन्ड्रॉईड मशिन्स फोर जी असून त्यामध्ये व्हिडीओ रेकॉर्डींग, फोटोग्राफ घेण्यासोबतच इतर अत्यावश्यक सुविधा आहेत. यामुळे नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालकांवर कारवाई करण्याच्या मोहीमेस गती मिळेल, असा विश्‍वास वाहतूक पोलिस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी व्यक्त केला आहे.