मोबाइल नंबर पोर्ट होणार दोन दिवसांत ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नंबर पोर्ट करू इच्छिणाऱ्यांसाठी आता एक खुशखबर आहे. ग्राहकांच्या ‘मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी’च्या रिक्वेस्टवर आता दोन दिवसांत कार्यवाही करण्याचे आदेश दूरसंचार नियामक आयोगाने टेलिकॉम कंपन्यांना दिले असल्याची माहिती समोर आली आहे. अनेकदा ग्राहकांच्या सिम कार्ड कंपनीबद्दल वेगवेगळ्या तक्रारी असतात. काहींना नेटवर्कचा  प्राॅब्लेम असताे तर काहींना दुसऱ्या कंपनीची सुविधा किंवा आॅफर घ्यायच्या असतात. काहींना कंपनीची सेवा ढीसाळ वाटते तर काहींना परवडत नाही आॅफर्स अशा एक ना अनेक कारणाने नंबर पोर्ट करणाऱ्यांची संख्याही बरीच आहे.

‘मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी’च्या रिक्वेस्टवर आता दोन दिवसांत कार्यवाही करण्याचे आदेश दूरसंचार नियामक आयोगाने टेलिकॉम कंपन्यांना दिले आहेत. सिम कंपनी बदलणाऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. इतकेच नाही तर ठोस कारणाशिवाय ग्राहकाची पोर्टेबिलिटीची रिक्वेस्ट नाकारल्यास संबंधित कंपनीला 10 हजार रुपयांचा दंडही भरावा लागणार असल्याचं समजत आहे.

याला कारणही तसेच आहे की, अनेकदा मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीच्या या छोट्या प्रक्रियेसाठी काही कंपन्या विनाकारण खूप वेळ घेतात. इतकेच नाही तर काही वेळा ग्राहकांची रिक्वेस्ट नाकारल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. या सर्व प्रकरणांचा आढावा घेत  ट्रायने ग्राहकहिताचा निर्णय घेत टेलिकॉम कंपन्यांना डेडलाइनच ठरवून दिली आहे. आपला मोबाइल क्रमांक कायम ठेवून केवळ टेलिकॉम कंपनी बदलण्याच्या या सुविधेचा फायदा अनेकांनी घेतला आहे. दरम्यान मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीमुळे अनेक ग्राहकांची मोठीच सोय झाल्याचं समोर आलं.

जर ग्राहकाने एकाच सर्कलमध्ये (मुंबईतल्या मुंबईत) मोबाइल नंबर पोर्ट करण्यासाठी रिक्वेस्ट केली असेल तर कंपन्यांना दोन दिवसात त्यावर कार्यवाही करावी लागणार आहे. जर ग्राहकाने  एका सर्कलमधून दुसऱ्या सर्कलमध्ये मोबाइल नंबर पोर्ट करण्यासाठी विनंती केली असेल तर कंपनीला चार दिवसांची मुदत देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे एसएमएसद्वारे पोर्टिंग रिक्वेस्ट मागे घेण्याची प्रक्रियाही सोपी आणि वेगवान करण्यात आली आहे. दरम्यान सुरुवातीला ‘मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी’साठी  15 दिवसांचा अवधी लागत होता आणि आता ही प्रक्रिया सोपी व वेगवान केली आहे.