तपासात कसूर करणाऱ्या ‘त्या’ दोन हवालदारांची तडकाफडकी बदली

सटाणा : पोलीसनामा ऑनलाईन – सटाणा शहरातील डॉ. किरण अहिरे यांच्या पत्नीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणाचा तपासात कसूर करणाऱ्या सटाणा पोलीस दलातील दोन पोलीस हवालदारांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी काही वरीष्ठ पोलीस अधिकारी रडारवर असल्याची चर्चा सध्या सटाणा पोलीस दालात आहे. हे वरिष्ठ पोलीस अधिकारी कोण याची उलट सुलट चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. शिंदे व नवनाथ पवार असे तडकाफडकी बदली करण्यात आलेल्या पोलीस हवालदारांची नावे आहेत.
नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, जिल्हा पोलीसप्रमुख संजय दराडे यांच्या आदेशाने सटाण्यातील डॉ. किरण अहिरे यांच्या पत्नी सुषमा अहिरे यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी गेल्या आठवड्यात मालेगावचे अपर अधीक्षक नीलोत्पल यांनी नव्याने तपास सुरू केला आहे. त्यांनी घटनास्थळाची दोन तास पाहणी केली होती. त्यानंतर डॉ. अहिरे यांच्यासह चार जणांची दिवसभर कसून चौकशी करण्यात आली.
या तपासादरम्यान हवालदार शिंदे व नवनाथ पवार यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्याने त्यांची बुधवारी तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांना तत्काळ मालेगाव पोलीस नियंत्रण कक्षात हजर होण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणात अजून काही कर्मचारी व अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या रडारवर असून त्यांचीही गच्छंती होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळणार असल्याचीही चर्चा तालुक्यात सुरू आहे