‘त्या’ युवकाच्या खुनाचा तपास सीआयडीकडे (CID) देण्याची मागणी 

कराड : पोलीसनामा ऑनलाइन – दोन वर्षापूर्वी विद्यानगर ता. कराड येथील गजानन हौसिंग सोसायटी परिसरातील राहत्या घरात निर्घृण खून झालेल्या विजय रामचंद्र पवार या युवकाच्या खून प्रकरणातील संशयीतांना निष्पन्न करण्यास पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे हा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपवावा, अशी मागणी पवार यांचा भाऊ विशाल पवार व कुटुंबियांनी केली.

पवार कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेवून विजय पवार यांच्या खुनाच्या तपासात प्रगती होत नसल्याने खंत व्यक्त केली. विशाल पवार म्हणाले, मोठे बंधू विजय पवार यांचा राहत्या घरी १ जानेवारी २0१७ रोजी निर्घृण खून झाला. त्या घटनेला आता दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र पोलिसांना आरोपी निष्पन्न करता आलेले नाहीत. सुरूवातीला हा तपास शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांकडे होता. मात्र तपासात प्रगती नसल्याने आम्ही कुटूंबियांनी विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांची दोन वेळा भेट घेवून तपास वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याकडे देण्याची मागणी केली. त्यानुसार पोलीस उपअधिक्षक नवनाथ ढवळे यांच्याकडे तपास सोपविण्यात आला.
त्यानंतर तपास अधिकारी नवनाथ ढवळे यांनी आमचे जबाब नोंदवले.

अनेकांकडे चौकशी केली. तांत्रिक बाबींची पडताळणी केली, त्याबाबत आम्हाला वेळोवेळी अवगत केले. मात्र या तपासातून अद्यापपर्यंत आरोपी निष्पन्न होऊ शकले नाहीत. त्यामुळे एक तर पोलिसांनी तपासाला गती द्यावी अन्यथा तपास सीआयडीकडे सोपवावा, अशी आम्हा कुटूंबियांची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

विजयचा पाय मुरगळला असल्याने त्याने दवाखान्यात जाण्यासाठी मित्र सदाशिव दोडमणी याला १ जानेवारीच्या सकाळी घरी बोलवले होते. त्यावेळी घरात विजय, त्याची बहिण, भावोजी व मुले होती. विजय टीव्ही बघत बसला होता. त्याने आपली कार स्व्हिहसिंग करून आण असे सदाशिवला सांगितल्याने तो कार घेवून निघून गेला. दुपारी दीडच्या सुमारास सदाशिव कार घेवून परतला, तेव्हा घराचा दरवाजा उघडा असल्याचे आणि विजयचा खून झाल्याचे सदाशिवच्या निदर्शनास आले. तशी फिर्याद त्याने पोलिसांत दिली आहे.

रक्ताने माखलेले जॅकेट, तलवारीसारखे शस्त्र व हातमोजे असे साहित्य पोलिसांनी घराच्या छतावरून जप्त केले. मात्र गुन्ह्याच्या तपासात अद्यापपर्यंत पोलिसांना आरोपीला अटक करता आलेली नाही, असेही विशाल पवार यांनी सांगितले. यावेळी विजयच्या विवाहित बहिणी मोहिनी चव्हाण, पुष्पा कांबळे, सपना थोरात, आशा लोकरे व भावोजी सुरेश कांबळे उपस्थित होते.