नगरमधील चार पोलीस ठाण्यातील निरीक्षकांच्या बदल्या

अहमदनगर : पोलीसनामा आॅनलाइन – राहुरीच्या पोलीस निरीक्षकांविरुद्ध दाखल झालेला गुन्हा तसेच प्रांताधिकारी दाणेज यांच्यावरील हल्ल्यानंतर श्रीगोंदा पोलीस निरीक्षकांनी केलेली वादग्रस्त विधाने यामुळे खांदेपालट करण्याची गरज निर्माण झाली होती.  नगर पोलीस अधीक्षकांनी चार पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांची बदली केली आहे. पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी शुक्रवारी रात्री हा आदेश काढला.

पारनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हनुमंत गाडे यांची राहुरी पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली  आहे. यापूर्वी उपनिरीक्षक असताना हनुमंत गाडे यांनी राहुरीत काम केले होते. त्यांच्या जागी पारनेरला श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दौलत जाधव यांची बदली श्रीगोंदा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
जाधव यांच्या जागी दहशतवाद विरोधी सेलचे पोलीस निरीक्षक विकास वाघ यांची श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. दहशतवाद विरोधी सेलचा अतिरिक्त पदभार मानव संसाधनचे पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांच्याकडे देण्यात आला आहे. चारही पोलीस निरीक्षकांच्या या बदल्या तात्पुरत्या स्वरुपात असल्याचे आदेशात म्हटले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक तडकाफडकी निलंबित 

प्रांताधिकारी दाणेज यांच्यावरील हल्ल्यानंतर श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे महसुल अधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात भूमिका घेतली होती. त्यामुळे याची दखल घेऊन पवार यांची बदली करण्याची आवश्यकता निर्माण झाली होती.