ट्रम्प यांच्या विरोधात राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी महिला हिंदू खासदार रिंगणात 

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – अमेरिकेतील पहिल्या हिंदू खासदार तुलसी गबार्ड २०२० ची राष्ट्राध्यक्ष निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी आपला पक्ष डेमोक्रेटिककडून उमेदवारी मिळवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. तुलसी यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना आपल्या निर्णयाची माहिती दिली. सिनेटर एलिझाबेथ वॉरेन यांच्यानंतर राष्ट्राध्यक्षपदासाठी शर्यतीत उतरणाऱ्या तुलसी केवळ दुसऱ्याच महिला आहेत. तुलसी गबार्ड यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा पुढील आठवड्यात होणार अशी शक्यता आहे. तुलसी संसदेच्या सशस्त्र सेवा समितीसह परराष्ट्र संबंधांवरील समितीच्या सदस्य आहेत. एकूणच चार वेळा खासदार झालेल्या तुलसी यांचे मोठे समर्थक आहेत.

राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा दावेदारी दिली आहे. त्यामुळे तुलसी आणि ट्रम्प यांच्यामध्ये थेट सामना होणार का हे पाहणे औत्सुक्याचे असेल. दरम्यान, तब्बल १२ डेमोक्रॅटीक नेत्यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान देण्यासाठी सज्ज झाले आहेत. अमेरिकन हिंदू समूदायामध्ये तुलसी अत्यंत लोकप्रिय आहेत. अमेरिकन लोकसंख्येमध्ये एक टक्का हिंदू लोकसंख्येचा आहे. तुलसी यांनी हवामान बदल, आरोग्य, न्यायव्यवस्था सुधारणा आदी मुद्यांवर अधिक भर असणार असल्याचे नमूद केले आहे.

तुलसी गबार्ड यांतचा जन्म अमेरिकेतील समोआ येथे एका कॅथोलिक कुटुंबात झाला होता. त्यांच्या आई कॉकेशियन हिंदू आहेत. त्यामुळे, तुलसी यांनी देखील हिंदू धर्म स्वीकारला. खासदार झाल्यानंतर भगवत गीतावरून शपथ घेणाऱ्या त्या अमेरिकेतील पहिल्याच नेत्या ठरल्या होत्या.

तर इतिहास घडणार
डेमोक्रेटिक पक्षाच्या अधिकृत उमेदवार होण्यासाठी तुलसी गबार्ड यांना प्रायमरी इलेक्शनमध्ये निवडून यावे लागेल. अवघ्या ३७ वर्षाच्या तुलसी यांनी आगामी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत बाजी मारल्यास इतिहास होणार आहे. जगातील सर्वांत शक्तीशाली देशाच्या सर्वांत तरुण आणि पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष होण्याचा मान तुलसी यांच्या नावावर नोंदवला जाईल.