दोघांना अटक, चोरीच्या 6 दुचाक्या जप्त

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – दुचाकी वाहने चोरणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या सहा दुचाक्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. चोरट्यांचा एक साथीदार फरार आहे.

अटक केलेल्यांमध्ये विशाल संभाजी सुतार (रा. सरकारी हॉस्पिटलसमोर, वांबोरी, ता. राहुरी), सोमनाथ गंगाधर वाघडकर (रा. वाघडकर वस्ती, भेंडा कारखाना, ता. नेवासा) यांचा समावेश आहे. दोघांचा साथीदार अनिल विष्णू साळवे (रा. जोशीवस्ती, अशोकनगर, श्रीरामपूर) हा फरार आहे.

राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे विशाल सुतार याने चोरीची दुचाकी विक्रीसाठी आणल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती. त्यावरून पवार यांच्या आदेशावरून त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक गणेश इंगळे, सहाय्यक फौजदार सोन्याबापू नाणेकर, पोलिस कर्मचारी मोहन गाजरे, बाळासाहेब मुळीक, योगेश गोसावी, रवींद्र कर्डिले, विशाल दळवी, अशोक गुंजाळ, रवींद्र सोनटक्के, मयुर गायकवाड, मच्छिंद्र बर्डे, सचिन आडबल, संभाजी कोतकर आदींनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. तर दोघांच्या मदतीने चोरी केल्याचे त्याने सांगताच पोलिसांनी सोमनाथ वाघडकर याला पकडले. त्याच्याकडून चोरीच्या आणखी पाच दुचाक्या हस्तगत करण्यात आले आहेत.

दुचाकीवर खोट्या नंबरप्लेट

सर्व मोटरसायकलचे नंबर बदलून प्लेटवर खोटे नंबर टाकले जात होते, अशी कबुली आरोपींनी दिली आहे. त्यांच्याविरुद्ध अनेक चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे टोळीचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे.