नापिकीला कंटाळून मराठवाड्यात २ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून मराठवाड्यात बीड व नांदेड जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पहिल्या घटनेत शिरुर कासार तालुक्यातील रायमोहा येथील युवा शेतकरी संतोष गोविंद सानप (४२) यांनी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना रायमोहा येथे घडली.

शिरुर कासार तालुक्यातील रायमोहा येथील रहिवाशी संतोष गोविंद सानप या शेतकऱ्याकडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सेवा सोसायटी, स्थानिक आर्थिक पतसंस्था आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कृषी कर्ज होते. यापैकी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व सेवा सोसायटी कर्ज वसुली प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. नैसर्गिक संकटामुळे शेती नापिक झाल्याने व दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक स्थिती नाजूक बनली होती.

याच तणावातून संतोष सानप या शेतकऱ्याने गुरुवारी विषारी औषध प्राशन केले होते. त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु रविवार रोजी उपचारदरम्यान त्यांचे निधन झाल्याने रायमोहा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. संतोष सानप यांना एक मुलगा, दोन मुली, पत्नी असा परिवार आहे.

कंधार तालुक्यातील दिग्रस येथील शेतकऱ्याने सततच्या नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि.२९) सकाळी ५.३० वाजता घडली. दिग्रस येथील शेतकरी मारोती रामराव मुंडे (५७, रा. दिग्रस ता. कंधार) सततच्या नापिकीमुळे आर्थिक अडचणीत आले होते. आर्थिक अडचणीमुळे दैनंदिन संसाराचा गाडा कसा चालवावा या विवंचेनेत मारोती मुडे यांनी आपल्याच घरी २९ डिसेंबरच्या पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली.

१ कोटी ७० लाखांच्या लाचेचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत ?