गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईतासह २ जण एलसीबीच्या जाळ्यात

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उरुळी देवाची येथून गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईतासह दोघांना उरुळी देवाची  येथील मंतरवाडी चाैकातून जेरबंद केले. त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. तर त्यांचा आणखी एक साथीदार पसार झाला आहे.

रणजित उर्फ डॅनी शरदचंद्र लोखंडे (वय २३ वर्षे रा.लक्ष्मी कॉलनी, हडपसर, पुणे) गणेश उर्फ गिल्या शामराव जगताप (वय २७ वर्षे रा. भेकराईनगर, हडपसर, पुणे ) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. तर त्यांचा साथीदार मनोज उर्फ बाबा थिटे (रा.पंधरा नंबर हडपसर पुणे) हा पोलिसांची चाहूल लागताच पसार झाला.

मनोज उर्फ बाबा थिटे हा पूर्वीचे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी हडपसर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा व लोणावळा येथे गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. तर रणजीत उर्फ डॅनी लोखंडे याच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात मारामारीचे दोन गुन्हे दाखल आहेत.

पुणे जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक संदिप पाटील व अपर पोलीस अधीक्षक संदिप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी एलसीबी शाखेकडील पथकांची नेमणूक करून गुन्हेगारांना जेरबंद करणेसाठी विशेष मोहीम सुरू केलेली आहे. शनिवारी एसलीबीच्या पथकाकडून रेकॉर्डवरील आरोपींचा शोध सुरु असताना रणजित उर्फ डॅनी लोखंडे व मनोज थिटे हे दोघे उरुळी देवाची येथे मंतरवाडी चौकात गावठी पिस्तूलासह येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तेथे साध्या वेशात छापा टाकून रणजित लोखंडे व गणेश जगताप या दोघांना ताब्यात घेतले. मात्र त्यांचा साथीदार मनोज थिटे हा पोलिसांची चाहूल लागताच तेथून पसार झाला. दोघांकडून पोलिसांनी एक गावठी पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे असा २५ हजार ३०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. तर मनोज उर्फ बाबा थिटे याच्यावर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे ग्रामीण एलसीबी शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक दिलीप जाधवर, महेश गायकवाड, निलेश कदम, दत्तात्रय तांबे, मोरेश्वर इनामदार, राजेंद्र पुणेकर, सचिन गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.