२० हजाराची लाच घेताना पुण्यातील २ पोलिस अँटी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कारागृहातील आरोपीला भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे घेतले जातात. त्यात गरीब, श्रीमंत असा भेद केला जात नाही. आजारी असल्याने एखाद्या कैद्याला ससून रुग्णालयात भरती केले तरी तेथे बंदोबस्तावर असलेल्या पोलीसांनी मुलाला भेटण्यासाठी वडिलांकडे चक्क लाच मागितली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बंदोबस्तावरील दोघा पोलिसांना २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.

स्वप्नील भीमराव भद्रे (वय ३०, रा. विश्रांतवाडी पोलीस लाईन), अनोश आगस्टिन गायकवाड (वय २४, रा. कनक अपार्टमेंट, दौंड) अशी पोलीस शिपायांची नावे आहेत.

तक्रारदार यांचा मुलगा शुक्रराज हा येरवडा तुरुंगात कोठडीमध्ये आहे. त्याने त्याच्याविरुद्ध केलेल्या कारवाई विरुद्ध तुरुंगात उपोषण सुरु केले आहे. त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या बंदोबस्तासाठी स्वप्नील भद्रे आणि अनोश आगस्टिन यांची नेमणूक केली आहे. त्याच्या वडिलांनी मुलाला भेटू देण्यासाठी विनंती केली. पण दोघांनी त्यांना भीक घातली नाही. मुलाला भेटायचे असेल तर २० हजार रुपयांची मागणी केली.

तेव्हा त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. त्यांनी तक्रारीची पडताळणी केल्यानंतर शुक्रवारी उशिरा ससून रुग्णालयात सापळा रचला. तक्रारदाराकडून २० हजार रुपये घेताना स्वप्नील भद्रे याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याला मदत व प्रोत्साहन दिले म्हणून अनोश गायकवाड यालाही पकडण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.