ड्यूटी लावल्याच्या कारणावरून दोन पोलिसांमध्ये तुबंळ हाणामारी

अलिबाग : पोलीसनामा ऑनलाईन – मनाविरुद्ध ड्युटी लावण्यावरुन दोन पोलिसांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार मंगळवारी (दि.१९) रात्री अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. मनाविरुद्ध ड्युटी लावल्याच्या कारणावरुन पोलीस उपनिरीक्षकाने एका पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्यात पिस्तुलचा दस्ता मारुन जखमी केले. या घटनेमुळे ड्युटी संदर्भातील भांडणे चव्हाट्यवार आली आहेत.

भांडणामध्ये पोलीस हवालदार मंगेश निगडे हे जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालायात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर पोलीस उपनिरीक्षक अश्विन जाधव याची खातेनिहाय चौकशी करणार असल्याचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी सांगितले.

जिल्हा मुख्यालयातील रिजर्व्ह पोलीस यांची पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार आरोपी कैदी पार्टी नेण्यासाठी ड्युटी लावली जाते. त्यानुसार पोलीस निरीक्षकांनी बुधवार (दि.२०) साठी ड्युटी लावण्यात आली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक यांनी दिलेली हजेरी यादीनुसार हजेरी मस्टर मंगेश निगडे यांनी पोलीस उपनिरीक्षक जाधव यांना ड्युटी लावली असल्याचे कळवले. याचा राग अश्विन जाधव यांना आला. हिराकोट तलावाजवळ निगडे व त्याचा साथीदार आले असता, पोलीस उपनिरीक्षक अश्विन जाधव यांनी त्यांना अडवून ड्युटी लावण्याबाबत विचारणा केली. त्यावेळी निगडे यांनी वरिष्ठ अधिकारी असल्याने त्यांना सन्मान देऊन सदर ड्युटी ही वरिष्ठांच्या आदेशाने लावल्याचे सांगितले.

मात्र डोक्यात राग घेऊन आलेले जाधव यांनी निगडे यांना शिवीगाळ करून आपल्या जवळील पिस्तुल काढून त्यात गोळ्या भरून तुला आता गोळ्याच घालतो असे सांगून त्याच्या अंगावर धरले. मंगेश निगडे यांनी प्रसंगावधान राहून रोखलेली पिस्तुल हाताने धरून जाधव यांना प्रतिकार केला. मात्र जाधव यांनी निगडे यांच्या डोक्यात पिस्तुलच्या दस्ताने तीन ठिकाणी मारून जखमी करून रक्तबंबाळ केले. निगडे यांनी त्याच अवस्थेत स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना भेटून घडलेला प्रकार सांगितला. अधिकाऱ्यांनी निगडे यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मंगेश निगडे यांनी आपल्यावर झालेल्या हल्ल्याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात जबाब लिहून दिला आहे.