२ भावांचा तलावात बुडून मृत्यू ; धीरजला वाढदिवशीच कवटाळले मृत्यूने

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – देवणी तालुक्यातील भोपणी येथील दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा भोपणीच्या पाझर तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. धीरज दत्ताजी मोरे (१२) व प्रणव राम मोरे (१२, दोघे रा. भोपणी, ता.देवणी) अशी मयत मुलांची नावे असून हे दोघे चुलत भाऊ आहेत. विशेष म्हणजे यातील धीरजचा वाढदिवस होता. तोच त्याच्या आयुष्याचा अखेरचा दिवस ठरला.

दुपारी ४ वाजेच्या सुमारास चार मित्र भोपणी येथील पाझर तलावावर गेले होते. यातील धीरज मोरे व प्रणव मोरे हे दोघे पोहण्यासाठी पाण्यात उतरले. परंतु, तलावात मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने दोघेही त्यात अडकले .त्यातून त्यांना बाहेर निघता आले नाही. या दोघांचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सदर विद्यार्थी हे भोपणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता ६ वी व ७ वीमध्ये शिकत होते. धीरजचा वाढदिवस असल्यामुळे त्यांची आई केक व कपडे खरेदी करण्यासाठी उदगीरला गेली होती. वाढदिवसादिवशीच धीरजवर काळाने झडप घातली.

या दोन्ही विद्यार्थ्यांची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे आपल्या रोजीरोटीसाठी वडील पुण्याला कामासाठी गेले आहेत. त्यामुळे घटना घडली त्यावेळी घरी कोणीही नव्हते. या संदर्भात विनायक पांडुरंग मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देवणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. रमेश कांबळे हे करीत आहेत. रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन करण्यात आले नसल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले.

युवतीचा ‘दृश्यम’ स्टाईल खुन, भाजपच्या नेत्यासह ५ जणांना अटक