तीन दुचाकी चोरट्यांकडून १२ लाखांच्या दुचाकी जप्त

नातेपुते (सोलापूर) : पोलीसनामा ऑनलाईन – तीन दुचाकी चोरट्यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून १२ लाख रुपये किंमतीच्या १२ दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई नातेपुते पोलीस आणि अकलूज उपविभागीय पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी संयुक्तपणे केली.

अक्षय संजय बोडरे (रा. फोंडशिरस), हरी तानाजी शिरतोडे( रा.फोंडशिरस), महादेव उर्फ सोनू अशोक चव्हाण (रा.घुमेरा, वेळापूर) अशी अटक करण्यात आलेल्या दुचाकी चोरांची नावे आहेत. आरोपींनी काही दुचाकी कमी किंमतीमध्ये विकल्याचे तपासात उघड झाले आहे.

नातेपुते आणि माळशिरस तालुक्यामध्ये दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते. या दुचाकी चोरांचा शोध घेत असताना सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ, सहाय्यक फौजदार राजाराम शिंदे आणि कॉस्टेबल अस्लम काझी यांनी आरोपींची माहिती काढली. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान त्यांनी दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून १२ लाख रुपये किंमतीच्या ५ बुलेट, २ शाईन, १ यूनिकॉर्न, एच एफ डिलक्स दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मनोज पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक सुशांत किनगे, राजाराम शिंदे यांच्या पथकाने केली.