सैन्यदलाच्या दोन विमानांची हवेत टक्कर, सहा नौसैनिक बेपत्ता  

टोकियो : वृत्तसंस्था – अमेरिकन मरीन कॉर्प्सच्या एफ १८ लढाऊ विमान आणि सी-१३० टँकर या  विमानांची हेवेत टक्कर होऊन अपघात झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात जपानच्या किनाऱ्यापासून काही किलोमीटर अंतरावर झाला. या अपघातात  सहा नौसैनिक बेपत्ता झाले असून एका नौसैनिकाला वाचवण्यात बचाव पथकाला यश आले आहे  .
अपघात नेमका कशाने झाला हे अजून कळले नाही परंतु हवेत इंधन भरण्याचा सराव करत असताना हा अपघात झाला असावा असा अंदाज अमेरिकन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. अमेरिकन मरीन कॉर्प्स हा सैन्य दलाचा भाग असून मरीन कॉर्प्स हे नौदल, हवाई दल आणि लष्कराबरोबर विविध सैन्य अभियानामध्ये सहभागी होत असतात. बेपत्तांचा  शोध घेण्यासाठी जपानने चार एअरक्राफ्ट आणि तीन जहाजे रवाना केली आहेत , असे जपानच्या संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
अमेरिकेच्या या दोन्ही विमानांनी इवाकुनी येथील मरिन कॉप्स एअर स्टेशनवरून उड्डाण केले होते. हे उड्डाण नियमित सरावाचा भाग होता. मात्र या उड्डाणादरम्यान अपघात झाला. आता या दुर्घटनेचा तपास सुरू आहे, अशी माहिती अमेरिकी नौदलाने दिली आहे.