राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढवणार ? उज्ज्वल निकम यांनी दिलं ‘हे’ उत्तर 

मुंबई : वृत्तसंस्था – मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीत राज्याचे विशेष सरकारी वकील

अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्या नावावर चर्चा झाल्याचे समजत आहे. त्यामुळे उज्ज्वल निकम हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यानंतर आता याबाबत उज्ज्वल निकम यांचीही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

यानंतर  उज्ज्वल निकम यांना लोकसभा निवडणूक लढवणार का ? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना उज्ज्वल निकम यांनी  ‘नो कमेंट्स’ असं म्हणत यावर काहीही बोलणं टाळलं आहे. त्यामुळे निकम हे नक्की निवडणूक लढवणार का हा मुद्दा स्पष्ट झाला नसून त्यांच्या उत्तराने उलट अजूनच  संभ्रम अजून वाढला असल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान, लोकसभा रणनीती ठरवण्याबाबत राष्ट्रवादीची मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. याच बैठकीत जळगाव लोकसभा मतदारसंघातून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्याबाबत खलबतं झाली असल्याची चर्चा आहे. पण निकम यांची सहमती घेतल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे असंही समजत आहे.

लोकसभेसाठी राष्ट्रवादीचे 6 उमेदवार निश्चित
आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ने उमेदवार निश्चित करण्यास सुरुवात केलीय. शुक्रवारी झालेल्या बैठकीत सहा संभाव्य उमेदवार कोण असतील याची पहिली यादी राष्ट्रवादीने तयार केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जागावाटपाचा गुंता सुटला आहे.

राष्ट्रवादीने आपल्याला मिळालेल्या मतदार संघात उमेदवार निश्चित करायला सुरूवात केलीय. रायगड, जळगाव, बीड, परभणी, उस्मानाबाद, कोल्हापूर या जागेबाबत आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.

हे आहेत संभाव्य उमेदवार – 
रायगड – सुनील तटकरे
जळगाव – अनिल भाईदास पाटील
रावेर, परभणी – स्थानिक नेत्यांनी एकमत होण्यासाठी वेळ मागितला
बीड – जयदत्त क्षीरसागर / अमरसिंग पंडित
कोल्हापूर – धनंजय महाडिक
भाजपचं आव्हान मोठं असल्याने फार ताणून न धरता वाद मिटवून कामाला लागण्याचं काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ठरवलं आहे. तर भाजप आणि शिवसेनेत युतीचा घोळ अजूनही सुरूच आहे.