सातारा जिल्ह्यातील २३ पोलीस ठाण्यात ‘ॲम्बीस’ संगणकीय प्रणाली  

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – घटनास्थळावरुन मिळालेले ठसे व इतर तांत्रिक बाबींच्या आधारे वेगाने तपास करत गुन्हेगाराला जेरबंद करण्यासाठी विकसित करण्यात आलेली ‘ॲम्बीस’ संगणकीय प्रणाली सातारा जिल्ह्यातील २३ पोलीस ठाण्यात बसविण्यात आली आहे. परिणामी प्रत्येक गुन्हेगाराच्या हाताचे ठसे, बुबूळ, पंजे, चेहरेपट्टी, फोटो यांचे संकलन होणार आहे. दरम्यान, ही प्रणाली चोवीस तास कार्यरत राहणार असून ती कार्यान्वीत करण्यात देशात महाराष्ट्र पहिला आहे.

खून, दरोडा, चोऱ्या, घरफोड्या व इतर गंभीर स्वरुपांच्या गुन्ह्यांचा तपास करताना पोलीस दल नेहमीच हाताचे ठसे व इतर बाबींना प्राधान्य देते. घटनास्थळावरुन मिळालेल्या ठशांची पडताळणी रेकॉर्डवर असणाऱ्या प्रत्येक गुन्हेगारांच्या ठशाशी करत अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीस दलाला यश आले आहे. गुन्हा घडल्यानंतर त्याठिकाणी सापडलेल्या वस्तू, हत्यारे यांच्यावर असणारे ठसे मिळवत त्याची पडताळणी करण्याचे काम यापूर्वीच्या काळात मानवी पध्दतीने करण्यात येत असे. घटनास्थळावरचे ठसे मिळवतानाच पारंपारिक पध्दतीने काळी शाई गुन्हेगारांच्या हाताला लावत त्याचे ठसे कागदावर घेवून त्याचे जतन करण्याचे जिकिरीचे काम पोलिसांना करावे लागत असे. या पध्दतीला लागणारा वेळ आणि त्यातील अचूकतेवर न्यायालयीन लढाईदरम्यान कायदेशीर प्रश्न निर्माण होत असत.