धारदार शस्त्राने सपासप वार करुन चुलत्याचा खुन

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – वडिलोपार्जित शेतीच्या वादातून पुतण्याने चुलत्याचा धारदार शस्त्राने सपासप वार करुन निर्घृण खुन केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी हत्यार फेकून दिले. राहाता तालुक्यातील शिंगवे गावच्या शिवारात ही घटना घडली.
रज्जाक बशीर शेख (वय 60) हे मयताचे नाव आहे. याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात पुतण्या मोहसीन यासीन शेख याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा – पुण्यात पद्मावती परिसरात तरुणाचा खुन

याबाबत समजलेली माहिती अशी की, राहाता तालुक्यातील शिंगवे गावच्या शिवारात असलेल्या वडिलोपार्जित शेतीच्या जागेवरून रज्जाक शेख व मोहसीन शेख यांच्यात वाद सुरू आहे. या वादातून त्यांच्यात नेहमीच भांडणे होत असत. बुधवारी (दि. 13) दुपारी रज्जाक शेख यांचा धारदार शस्त्राने निर्घृण खुन केला. त्यानंतर शस्त्र कुठेतरी टाकून देत पुरावा नष्ट केला.
याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात मयताची पत्नी शाबीरा रज्जाक शेख (वय 55, रा. शिंगवे, ता. राहता) यांच्या फिर्यादीवरून मोहसीन शेख याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाचे कलम 302, 201 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पाटील हे करीत आहेत. शिर्डीचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे व राहाता पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण परदेशी यांनी घटनास्थळी भेट दिली.