आणि म्हणून अंतर्वस्त्र घेऊन संसदेत पोहोचल्या ‘या’ महिला खासदार

अायर्लंड : वृत्तसंस्था – अायर्लंडमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. बलात्काराच्या आरोपीची सुटका केल्याने आयर्लंडमध्ये आक्रोश होताना दिसत आहे. इतकंच नाही तर अंतर्वस्त्र घेऊन महिला खासदारही संसदेत पोहोचल्या. आयर्लंडमध्ये बलात्काराच्या आरोपीची सुटका केल्याने सोशल मीडियावर संताप व्यक्त होताना दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे न्यायालयात आरोपीच्या वकिलांनी, मह्त्त्वाचा पुरावा मानत पीडित तरुणीचं अंतर्वस्त्र सादर केलं. विशेष बाब अशी की, सहमतीने शारिरीक संबंध ठेवण्यात आल्याचाही दावा केला. यानंतर महिलांनी संताप व्यक्त करत सोशल मीडियावर #ThisIsNotConsent (ही सहमती नाही) हॅशटॅग करत आपल्या अंतर्वस्त्राचा फोटो ट्विट करत आहेत. आयर्लंडच्या खासदार रुथ कॉपिंगर तर यांनी थेट संसदेतच अंतर्वस्त्र दाखवत आपला विरोध दर्शवला.

एका 17 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला होता. न्यायालयाने  6 नोव्हेंबरला या प्रकरणावर सुनावणी केली. त्यात 27 वर्षीय आरोपीची सुटका झाल्याचे समोर आले. पीडित तरुणी आरोपीकडे आकर्षित होती. हा बलात्कार नसून सहमतीने ठेवलेले शरीरसंबंध होते असा दावा बचाव पक्षाच्या वकिलांनी केला. इतकंच नाही तर बचाव पक्षाच्या वकिलांनी पीडित तरुणीचं अंतर्वस्त्र महत्त्वाचा पुरावा असल्याचा दावा करत न्यायालयात सादर केलं. आरोपीची सुटका करण्यात आल्यापासून आयर्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होताना दिसत आहे.

दरम्यान यावेळी संताप व्यक्त करताना महिला खासदार रुथ कॉपिंगर म्हणाल्या की, “सुनावणीदरम्यान पीडित तरुणीचं अंतर्वस्त्र दाखवण्यावर त्यांनी कठोर शब्दांत आक्षेप नोंदवला. या कृत्यामुळे त्या तरुणीला किती लज्जास्पद वाटलं असेल याचा विचार केला गेला पाहिजे असं त्यांनी म्हटलं. भर न्यायालयात अंतर्वस्त्र दाखवलं तेव्हा तिच्या काय भावना असतील हा विचार करुनच संताप येतो.” इतकंच नाही तर पीडित तरुणीलाच दोषी ठरवण्याच्या विचारसरणीला विरोध करण्यासाठी आयर्लंडच्या महिला खासदार रुथ कॉपिंगर आपलं अंतर्वस्त्र घेऊन संसदेत पोहोचल्या.