क्राईम स्टोरी

सराईताच्या टोळीकडून पुणे, पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यातील ३८ गुन्ह्यांची उकल

गुन्हे शाखेच्या युनीट ५ ची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – दरोड्याच्या तयारीत असलेल्या ६ जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनीट ५ च्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून पुणे, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातील दरोडा, जबरी चोरी, वाहनचोरी असे ३८ गुन्हे उघडकिस आणले आहेत. त्यांच्याकडून ४०२ ग्रॅम सोने, ५ ग्रॅम चांदी, ११ दुचाकी असा १७ लाख १६ हजार २१४ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ऋषिकेश उर्फ हुक्या श्रीकांत गाडे (२२, अपर इंदिरानगर), गौरव उर्फ लाल्या फडणीस (२७, पर्वती दर्शन), चाँद फकरुद्दीन शेख (२०, बिबवेवाडी), गणेश बाळासाहेब कांबळे (२१, अप्पर), सुर्यकांत किसन कोळी (२३, घोरपडी पेठ), तोहित तय्यब काझी (२८, घोरपडी पेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा पुणे शहर व जिल्ह्यात चोरीच्या वाहनांचा वापर करून नागरिकांना लुटणारा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार हुक्या उर्फ ऋषिकेश गाडे हा साथीदारांसोबत मिळून मागील काही महिन्यांपासून लोकांना कोयत्याच्या धाकाने लुटत आहे. तसेच तो आपल्या चार ते पाच साथीदारांसह मिळून कोंढवा येथील खडी मशीन चौकतील एस.के.अटो केअर हा पेट्रोलपंप लुटण्यासाठी येणार असल्याची माहिती युनीट ५ चे पोलीस हवालदार अमजद पठाण, पोलीस नाईक अंकुश जोगदंड यांना मिळाली. त्यानंतर युनीट पाचच्या पथकाने सापळा रचून ६ जणांना अटक केली. त्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्याना चैनीच्या वस्तू घेण्यासाठी व प्रेयसीवर खर्च करण्यासाठी पैशांची गरज असल्याने ते पेट्रोल पंपावर दरोडा टाकणार होते. अशी कबूली दिले. तसेच त्यांच्याकडून पुढील चौकशीत ४०२ ग्रॅम सोने, ५ ग्रॅम चांदी, ११ दुचाकी दोन कोयते, फायटर, दोरी, मिरची पावडर असा १७ लाख १६ हजार २१४ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई प्रभारी अप्पर पोलीस आयुक्त ज्योती प्रिया सिंह, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्ता चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, सहायक पोलीस फौजदार लक्ष्मण शिंदे, संतोष मोहिते, प्रदिप सुर्वे, अमजद पठाण, राजेश रणसिंग, दत्ता काटम, समीर शेख, राजाभाऊ भोरडे, संजय देशमुख, महेश साळवी, सचिन घोलप, दया शेगर, प्रमोद गायकवाड, अंकुश जोगदंडे, महेश वाघमारे, प्रविण काळभोर, अशोक शेलार, प्रमोद घाडगे यांच्या पथकाने केली.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या

Back to top button