अनावधाने कचऱ्यासोबत घंटागाडीत फेकले पैसे

अंबाजोगाई : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील एका व्यापाऱ्याने अनावधानाने १५ हजाराची रक्कम असलेली पिशवी घरातील कचऱ्यासोबत घंटागाडी मध्ये टाकून दिली. मात्र, कचरा डेपोतील रखवालदार आणि इतर कर्मचाऱ्यांनी त्यापैकी ५ हजार रुपये कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून शोधून देत प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले.

व्यावसायिक हरीश पाम्पटवार यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील वट्टमवार कॉलनीत घर आहे. मंगळवारी सकाळी त्यांनी १५ हजार रुपयांची रक्कम असलेली पिशवी अनावधाने कचऱ्याच्या पिशव्यासोबत घंटा गाडीत टाकून दिली. थोड्याच वेळात त्यांना झालेली गडबड लक्षात आली. त्यांनी तातडीने नगर पालिकेचे स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे यांच्याशी संपर्क साधून त्यांना ही माहिती दिली. शहरातील कचरा गोळा करून सर्व घंटा गाड्या नुकत्याच कचरा डेपोकडे गेल्याचे माहित असल्याने अनंत वेडे यांनी कचरा डेपोचे रखवालदार राजेश जोगदंड यांना याबाबत सूचित केले. त्यानंतर राजेश जोगदंड, दत्ता शिंदे, महेश साबळे, सागर वैद्य, लखन वैद्य, युवराज कांबळे यांनी सर्व गाड्या आणि कचऱ्याचा ढिगारा पिंजून काढला असता त्यांना यात पाच हजार रुपये आढळून आले. ही रक्कम त्यांनी प्रामाणिकपणे हरीश पाम्पटवार यांना बोलावून घेऊन त्यांच्याकडे सुपूर्द केली. त्यांनतरही उर्वरित रकमेचा शोध घेण्याचा प्रयत्न सर्व कर्मचाऱ्यांनी केला, परंतु ते सापडू शकले नाहीत.

निदान पाच हजार रुपये तरी परत मिळाल्याबद्दल पाम्पटवार यांनी वेडे आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले. राजेश जोगदंड आणि इतर कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.