सोलापूर महापालिकेत विरोधकांचा राडा… केले ‘मटके फोडू’ आंदोलन 

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – सोलापूर महापालिकेत सध्या भाजपाची सत्ता आहे. पण पक्षातच अंतर्गत वाद आहे आणि या वादाचा परिणाम शहराच्या विकासावर होतो आहे असे आरोप करीत विरोधी पक्षनेत्यांनी आज महापालिकेत एकच राडा घातला. एवढेच नाही तर यावेळी सभागृहात मट्के फोडून आंदोलन करण्यात आले. त्यामुळे विरोधकांचा रुद्रावतार पाहून महापौर शोभा बनशेट्टी यांना सभा तहकूब करावी लागली.

पक्षातच गटबाजी
सहकार मंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजय देशमुख यांच्यातील वादामुळे शहराच्या विकासावर परिणाम होत असल्याचा आरोप करत शहराचा विस्कळीत पाणीपुरवठा, निधी वाटपात होत असलेल्या भेदभावाच्या निषेधार्थ तसेच विविध मागण्यांसाठी सोलापूर महानगरपालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बसपासह विरोधी पक्षांनी सर्वसाधारण सभागृहात मटके फोडून आंदोलन केले. महापौरांनी विरोधकांचे ऐकून न घेतल्याने नगरसेवक प्रचंड संतापले होते.

यावेळी विरोधी नगरसेवकांनी काळे कपडे परिधान करुन सभागृहात प्रवेश केला होता. त्यावर विविध मागण्या लिहिल्या होत्या. सभागृहात येताच विरोधकांनी मोठमोठ्या आवाजात घोषणा देण्यास सुरुवात केली. अखेर हातातील मटके सभागृहात फोडण्यात आले.

सोलापूर महापालिकेत पहिल्यांदाच भाजपाची सत्ता आली आहे. परंतु, दोन मंत्र्यांच्या वादामुळे शहर विकासावर परिणाम होत असल्याचे विरोधकांचे मत आहे. ऐन सणासुदीच्या काळात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. विरोधकांना निधी देण्यात दुजाभाव केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.