आरोग्यसंपन्न राहण्यासाठी मिर्ची लेपन अभिषेक

वेलुप्पुरम – वृत्तसंस्था – भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. तेथील रूढी, परंपरा ,संस्कृती, प्रथा, परंपरा वेगवेगळ्या आहेत. अनेक ठिकाणच्या रुढींनी आपले वेगळे अस्तित्व जोपासले आहे. दक्षिण हिंदुस्थानात विविध प्रकारची मंदिरे आहेत. त्यांच्या परंपरा रुढी वेगवेगळ्या आहेत. अशाच एका मंदिरात रोगमुक्तीसाठी चक्क मिरचीलेपन अभिषेक केला जातो. भाविकाला लाल मिरचीपूड भरवून त्याच्या अंगाला मिरच्यांचा लेप लावण्यात येतो.

तामिळनाडूतील वेलुप्पुरम जिल्ह्यात इद्यांचवाडी गावात वर्ना मुथु मरियम्मन नावाचे मंदिर आहे. या गावातील भाविक हरी श्रीनिवासन यांना 1930 मध्ये देवाने दृष्ट्यांत देऊन गावातील भाविकांनी रोगमुक्त करण्यासाठी अभिषेक करण्यास सांगितला. या मंदिरात दरवर्षी 8 दिवसांचा उत्सव साजरा केला जातो. या महोत्सवात मिरच्यांचा अभिषेक म्हणजे मिरचीलेपन अभिषेक हे विशेष आकर्षण असते. हा अभिषेक बघण्यासाठी देश परदेशातील अनेक भाविक येतात. भाविकांनी आरोग्यसंपन्न राहावे आणि गावातील रोगांचे रोगनिवारण व्हावे, यासाठी मिरचीलेपन अभिषेक करण्याची परंपरा 85 वर्षांपासून या मंदिरात सुरू आहे.

मंदिराच्या प्रथेनुसार या अभिषेकासाठी तीन वरिष्ठ भाविक आपल्या हातात विशिष्ठ बंधन म्हणजे रक्षासूत्र बांधतात. त्यानंतर ते दिवसभराचा उपवास करतात. या उपवासानंतर त्यांचा मुंडनसंस्कार करण्यात येतो. या विधीनंतर पुजारी या तिघांची देवाप्रमाणे पूजा करतात. ही पूजा झाल्यावर त्यांना चंदन, फुलांच्या पाकळ्या यासारख्या विविध सामग्रींनी अभिषेक करण्यात येतो. या अभिषेकानंतर त्यांना मिरच्यांचा लेप भरवून तो त्यांच्या अंगावर लावतात. त्यानंतर मिरच्यांच्या लेपाने त्यांना अभिषेक करण्यात येतो. त्यानंतर त्यांना कडुलिंबांच्या पाण्याने स्नान घालण्यात येते. या सर्व अभिषेकानंतर ते मंदिरात प्रवेश करतात. मंदिरात त्यांना जळत्या निखाऱ्यांवर चालायचे असते, अशा प्रकारे हा विधी पूर्ण केला जातो.