पर्मनंट लायसन्ससाठी ‘एवढी’ महिने वेटींग…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – प्रादेशिक परिवहन विभागाची (आरटीओ) स्थिती पाहता कायमस्वरुपी वाहनपरवाना मिळविण्यासाठी चार महिने थांबा अशी परिस्थिती दिसत आहे. यामुळे उमेदवार त्रस्त झाल्याचेही दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर उमेदवारांनी आरटीओ कार्यालयात धरणे केले. शिवाय सुट्टीच्या दिवशी देखील कार्यालय सुरु ठेवण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. पुणे शहर मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष राजू घाटोळ आणि वाहन परवाना प्रलंबित असलेल्या उमेदवार आंदोलनात सहभागी झाले होते.

राज्यातील सर्वाधिक वाहन नोंदणी होणाऱ्या कार्यालयात पुणे आरटीओ कार्यालयाचा वरचा क्रमांक लागतो. शहरातील वाहनसंख्येचे चाळीस लाखांच्या दिशेने प्रवास सुरु केल्याचा दिसत आहे. वाहन परवाना काढताना शिकाऊ आणि पक्क्या वाहन परवान्यासाठी ऑनलाईन दिवस आणि वेळ आरक्षित करावा लागतो. उमेदवारांची संख्याही अधिक आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात पक्क्या वाहन परवान्याचा कोटा कमी आहे. त्यामुळे पक्क्या परवान्यासाठी ऑनलाईन अपॉईंटमेंट घेतल्यास थेट चौथ्या महिन्यातील तारीख मिळत आहे असे निदर्शनास आले आहे. शिकाऊ परवान्यासाठी देखील एक ते दीड महिन्याची प्रतिक्षा यादी आहे. पक्क्या वाहन परवान्याची प्रतिक्षा यादी ६ हजारांच्यावर गेली असल्याची तक्रार पुणे शहर ड्रायव्हिंग असोसिअशनच्या वतीने आरटीओ कार्यालयाकडे करण्यात आली आहे असेही समोर आले आहे. सदर वाढती प्रतिक्षा यादी लक्षात घेता ही यादी कमी करण्याच्या हेतूने दुसरा व चौथा शनिवार, तसेच दर रविवारी देखील वाहन परवान्याची चाचणी सुरु ठेवावी अशी मागणी संघटना आणि उमेदवारांच्या वतीने आरटीओ कार्यालयाकडे करण्यात आली आहे.

याबाब माहिती देताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे म्हणाले, “पक्क्या वाहन परवान्यासाठी चौथ्या महिन्यातील तारीख मिळत असल्याची तक्रार उमेदवारांनी केली. प्रतिक्षा यादी कमी करण्यासाठी शनिवार आणि रविवारच्या सुट्टीच्या दिवशी देखील कार्यालय सुरु करण्याचा विचार आहे. प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतर सुट्टीच्या दिवशी देखील कामकाज सुरु करण्यात येईल.”

पुढे बोलताना ते असेही म्हणाले की, “शिकाऊ परवानाधारक उमेदवार अनेकदा शेवटच्या महिन्यात पक्क्या परवान्यासाठी ऑनलाईन अपॉईंटमेंट घेताना दिसतात. शिकाऊ परवाना घेतल्यानंतर ३० दिवसांनी ऑनलाईन अपॉईंटमेंट घेतल्यास या त्रासातून सुटका होऊ शकते. प्रतिक्षा यादी कमी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या मान्यतेने सुट्टीच्या दिवशी देखील कार्यालय सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात येईल.”