महसुल विभागातील उच्च पदस्थ (सुपर क्लास-१) अधिकाऱ्याचे तडकाफडकी निलंबन

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन –  १ कोटी ७० लाख रुपयांच्या लाच प्रकरणात सह आरोपी असलेले भूमी अभिलेखचे उपसंचालक बाळासाहेब वानखेडे यांचा अटकपूर्व जामीन विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांनी फेटाळला. वानखेडे यांना हे प्रकरण चांगलेच महागात पडले असून त्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले असल्याचे सुत्रांनी सांगितले. वानखेडे यांच्या तडकाफडकी निलंबनामुळे महसुल विभागात खळबळ उडाली आहे.

१ कोटी ७० लाख रुपयांच्या लाच प्ररणाची आज न्यायालयात सुनावणी झाली. उपसंचालक वानखेडे यांनी याप्रकरणात जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता. मात्र, वानखेडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तपासासाठी बोलविल्यानंतर त्याने आपला अ‍ॅड. शेंडेशी काहीही संबंध नसल्याचे लिहून दिले आहे. त्यात त्याने इतर वकीलांसारखाच तो कार्यालयात येत असल्याचे म्हटले आहे. दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकून घेत न्यायालयाने शुक्रवारी वानखेडे यांचा जामीन फेटाळला. त्यामुळे वानखेडे यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे.

याप्रकरणात लाचलुचपत विभागाने भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी व इतर अधिकाऱ्यांचे ही जबाब नोंदवले आहेत. याप्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने प्रथमच लाचखोरीच्या गुन्ह्यामध्ये भारतीय दंड संहिता कलम १२० (ब)  हा गुन्ह्याचा कट रचने यानुसार कलम लावले आहे. अ‍ॅड. शेंडे व वानखेडे यांनी लाच घेण्याचा हा एक प्रकारे कट रचल्याचे तपासात समोर आले आहे. या गुन्ह्याच्या तपासात आणखी काही जणांचाही समावेश आहे का, याचा एसीबीकडून तपास सुरु आहे.