प्रेमास नकार दिल्याने युवतीवर तिक्ष्ण हत्याराने वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- प्रेमसंबंधास नकार देणाऱ्या युवतीचा एका तरुणाने पाठलाग करुन तिच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील सिंहगड रस्ता भागात ही खळबजनक घटना घडली असून पोलिसांनी आरोपीचा पाठलाग करुन अटक केली. हा प्रकार मंगळवारी (दि.२५) रात्री पावणे नऊच्या सुमारास धायरी येथील बारांगणी मळा येथे घडला. या घटनेमध्ये युवती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

लक्ष्मण तुकाराम धावडे (रा. किरकिटवाडी, सिंहगड रस्ता) याला अटक करण्यात आली आहे. तर जखमी झालेल्या युवतीने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. फिर्य़ादी युवती ही कात्रज भागातील रहिवाशी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी युवती ही धायरी भागात ब्युटी पार्लरचा व्यवसाय करते. तर आरोपी हा गाड्यांचे सुटे भाग तयार करण्याचा व्यवसाय करतो. या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र, विवाहीत धावडेसोबतचे संबंध युवतीने तोडल्याने तो तिच्यावर चिडून होता. प्रेमसंबंध तोडल्याने आरोपीने तिला  त्रास देण्यास सुरुवात केली. तसेच वर्षभरापूर्वी तिला मारण्याचा प्रयत्नही त्याने केला होता.

मंगळवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास फिर्यादी युवती ही तिच्या दुचाकीवरुन जात होती. तिच्या मागावर असलेल्या धावडेने मोटार दुचाकीला आडवी घालून तिची गाडी आडवली. आरोपीने सोबत आणलेल्या धारदार शस्त्राने युवतीवर सपासप वार केले. युवतीने आरडाओरडा केल्यानंतर धावडे घटनास्थळावरुन पसार झाला. पोलीस आपल्या मागावर असल्याची माहिती धावडेला मिळाली. धावडे किरकिटवाडी भागात गेला. तेथून तो काही अंतरावर असलेल्या डोंगरावर गेला. धावडे किरकिटवाडी भागात लपल्याची माहिती पोलीस कर्मचारी संतोष सावंत यांना मिळाली. पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून धावडेला अटक केली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक ननावरे, सावंत, रफिक नदाफ, निलेश जमदाडे, गोसावी, पडवळ आदींनी धावडेला किरकिटवाडी भागातून ताब्यात घेतले.