‘आपण जे ऐकतो त्यापेक्षा जे पाहतो ते दीर्घकाळ स्मरणात राहते’ : संशोधक

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – आपण अनेकदा पाहतो की खूप माणसे समाजात अशी असतात की जे ऐकीव बातम्यांवर बिल्कुलच विश्वास ठेवत नाहीत. जे ते डोळ्यांनी पाहतात त्यावरच ते विश्वास ठेवतात. अर्थातच ‘चक्षुर्वै सत्यम्’ म्हणजेच जे ऐकले त्यापेक्षा जे डोळ्यांनी ढळढळीत पाहिले त्यावरच मी विश्वास ठेवीन असं. शिवाय कान आणि डोळे यांच्यात चार बोटांचं अंतर आहे म्हणजेच ऐकणे आणि पाहणे यामध्ये चार बोटांचे अंतर आहे अशी म्हणही आपल्याकडे प्रचलित आहे. परंतु आता स्मरणशक्तीच्या बाबतीतही हीच स्थिती असते, असे संशोधकांनी म्हटले आहे. आपण ऐकण्यापेक्षा जे पाहतो, ते दीर्घकाळ स्मरणात राहत असल्याचे संशोधकांनी सांगितले आहे.

अमेरिकेतील इओव्हा विद्यापीठातील संशोधकांनी याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान संशोधक जेम्स बिलॉव्ह यांनी याबद्दल अधिक माहिती दिली आहे. ते म्हणाले की, “आपण प्रत्यक्षात जे पाहतो, ते ऐकण्यापेक्षा जास्त काळ स्मरणात राहते. या संशोधनासाठी शंभर मुलांची सुमारे दीड महिना चाचणी घेतली असता ही गोष्ट जाणवली. कोणतीही गोष्ट स्मरणात ठेवण्यासाठी मेंदूमध्ये विशिष्ट रचना कार्यरत असते. प्रत्यक्षात पाहिलेल्या व ऐकत असलेल्या घटनांची मेंदू वेगवेगळ्या पद्धतीने नोंद घेतो.”

पुढे बोलताना जेम्स बिलॉव्ह असेही म्हणाले की, “ऐकण्यापेक्षा आपण प्रत्यक्षात जे पाहतो त्यामध्ये पाहिलेल्या घटनेचा परिणाम बराच काळ मनात विचार सुरू असल्याने दीर्घकाळ स्मरणात राहतो. यातील दुसरा भाग म्हणजे कोणी काही सांगत असताना आपले त्याकडे पूर्ण क्षमतेने लक्ष असतेच असे नाही, घटना पाहताना मात्र मन, मेंदू दोन्ही एकत्रितरीत्या काम करतात. परिणामी, लक्षात राहण्याचे प्रमाण जास्त असते.”