…तुमची औकात काय ? :  पवारांचा जळजळीत सवाल 

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान बोलताना भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा आणि मुंबईतील भाजप खासदार पूनम महाजन यांनी  राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि जेष्ठ नेते शरद पवार यांची तुलना थेट रामायणातील मंथरा आणि महाभारतातील शकुनी मामासोबत केली त्यावरून राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी बरेच दिवस मौन बाळगले होते मात्र अखेर त्यांनी आपले मौन सोडले आहे. एका कर्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी भाजपच्या खासदार पूनम महाजन यांना ” आमचे दैवत असलेल्या पवारसाहेबांना ‘शकूनी मामा’ची उपमा देणाऱ्या पूनम महाजन तुमची औकात काय?  तुझ्या बापाला तुझ्या चुलत्याने का मारलं असं जर आम्ही तुला विचारलं तर तुझ्याकडे काय उत्तर आहे… असे खडे बोल अजित पवार यांनी सुनावले. बारामती तालुक्यातील कुरणेवाडी येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.

आपल्या उंचीप्रमाणे वागलं पाहिजे
यावेळी बोलताना पवार म्हणाले, ”आपण काय बोलतोय, कोणाबद्दल बोलतोय याचं भान त्यांनी ठेवायला हवं होतं. तुझ्या बापाला तुझ्या चुलत्याने का मारलं असं जर आम्ही तुला विचारलं तर तुझ्याकडे काय उत्तर आहे…सख्या भावाने सख्ख्या भावाला मारलं, मग हे महाभारत कशामुळे घडलं, असा प्रश्न आम्ही विचारायचा का तुम्हाला? जसं तुम्हाला बोलता येतं तसा आम्हाला बोलता येतं. पण पातळी सोडायला नको हा विचार करून आम्ही काही बोलत नाही. पण आम्ही शांत बसतो याचा अर्थ तुम्ही काहीही बोलाल आणि आम्ही ते सहन करू असा होत नाही, असा इशाराच अजित पवार यांनी दिला.ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाभळी असतात. त्यामुळे  जास्त शहाणपणा करू नये आणि संयम पाळावा असे पवार म्हणाले. आपल्या आपल्या उंचीप्रमाणे प्रत्येकाने वागलं पाहिजे आणि याचे भान ठेवले पाहिजे असा टोलाही त्यांनी महाजन यांना लगावला.

नक्की काय म्हणाल्या होत्या पूनम महाजन
मुंबईत सोमय्या मैदानावर आयोजित भाजपयुमोच्या सीएम चषक पारितोषिक वितरण सभारंभ प्रसंगी बोलताना पूनम महाजन म्हणाल्या, ‘शरद पवार हे रामायणातील मंथरा, तर महाभारतातील शकुनी मामा आहेत. सगळ्यांचं ऐकल्याचं दाखवून शकुनी मामासारखे नाक खुपसून सगळीकडे महाभारत सुरु करणारे शरद पवारही या महाआघाडीत आहेत. स्वत:ला मिळालं नाही, की इकडचं तिकडे, तिकडचं इकडे करणाऱ्या मंथरा आणि शकुनीसारखी पवारांची अवस्था आहे. असे हे सगळे मिळून मोदींच्या विकासरथाला अडवू पाहत आहेत. परंतु महाआघाडीच्या दलदलीत भाजपचं कमळच उमलेल’ असा विश्वास पूनम महाजन यांनी व्यक्त केला होता.

अयोध्येय मंदिर बांधायला निघालेत,आधी वडिलांच्या स्मारकाकडे लक्ष द्या
यावेळी बोलताना, उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून अजित पवार यांनी त्यांच्यावर नाव न घेता टीका केली. महाराष्ट्रातील माती अयोध्येमध्ये नेऊन त्यांनी काय साध्य केले, असे विचारत काहीही बनवा बनवी करतात असा आरोप केला. अयोध्येत राम मंदिर बांधायला निघालेले आहेत. पण तुमचे वडील जाऊन पाच वर्षे झाले अजून त्यांचं स्मारक मुंबईत का उभे राहिले नाही, याकडे लक्ष द्या असेही ते म्हणाले.

शिवजयंतीला कधीही हे लोक शिवरायांना अभिवादन करायला शिवनेरीला येत नाहीत, हे लोक मुंबईत राहतात पण सहा डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमाला दादरला ते येत नाहीत. हेच एकेकाळी म्हणत होते ज्यांच्या घरात खायला नाही पीठ, त्यांना कशाला हवे विद्यापीठ…. आणि आता शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आले पाहिजे असे सांगत लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात.