श्रीनिवास पाटील अन्‌ विठोबा लांडेंच्या जेव्हा गप्पा रंगतात…!

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – राजकारण आणि समाजकारणात वावरताना मैत्रीचे बंध तयार होतात. मात्र, अनेक वर्षे उलटल्यानंतरही हे बंध कितपत घट्ट राहतील हे सांगता येणे अशक्यच. मात्र, पिंपरी-चिंचवडच्या राजकारण आणि समाजकारणातील एक मैत्री अशीच टिकून आहे. ही मैत्री आहे सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील आणि जुन्या पिढीतील सामाजिक कार्यकर्ते विठोबा लांडेंची. नुकतीच श्रीनिवास पाटील यांनी विठोबा लांडे यांची भेट घेत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

विठोबा लांडे यांचे नाव घेतल्याशिवाय भोसरीचे समाजकारण पुर्ण होत नाही. श्रीनिवास पाटील हे पिंपरी-चिंचवड नगरपालिकेचे माजी आयुक्त आहेत. त्यावेळी विठोबा लांडे नगरसेवक होते. शहरातील सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवणारे विठोबा लांडे आणि प्रशासक म्हणून काम करणारे श्रीनिवास पाटील यांच्यात नकळत मैत्रीचे बंध जुळले. विठोबा लांडे यांनी चुकीच्या कामांविरोधात आवाज उठवल्यानंतर टीकेला सामोरे जात असतानाही या दोघांमधील मैत्रीमध्ये कधीही खंड पडला नाही. दोघेही आपआपले काम करत राहिले. याच्या आड कधीही मैत्री येवू दिली नाही.

विठोबा लांडे यांच्याकडून समाजकारणाचा वारसा मिळाल्याने त्यांचे चिरंजीव विलास लांडे आणि सुनबाई मोहिनी लांडे या दाम्पत्याला महापौर होण्याचा सन्मान मिळाला. खरंतर हे अपवादानं घडतं. त्याचा इतरांना हेवा वाटत असला तरी विठोबा लांडे यांनी समाजकारणासाठी राजकारण केल्याचे ते फलित मानले जाते. इतकी वर्ष उलटूनही विठोबा लांडे आणि श्रीनिवास पाटील यांच्यातील मैत्री आजही कायम आहे. माजी आयुक्त आणि नगरसेवक यांच्यातील मैत्रीचे हे दुर्मिळ उदाहरण म्हणावे लागेल.

श्रीनिवास पाटील नुकतेच पिंपरी-चिंचवडमध्ये आले होते. त्यांनी विठोबा लांडे यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली. या दोन्ही मित्रांमध्ये बराचवेळ चर्चा झाली. त्यात जुन्या आठवणींपासून शहर विकासापर्यंतच्या गप्पा रंगल्या. तब्बल दीड तास या गप्पा सुरू होत्या. चक्क एका राज्याचे माजी राज्यपाल एका जुन्या मित्राला भेटण्यासाठी येतात काय आणि त्यांच्यात निखळ गप्पा रंगतात काय हे चित्र पाहताना अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मैत्री असावी तर अशी असे उद्‌गार नकळत याठिकाणी उपस्थितांच्या तोंडून निघून गेले.

याबाबत प्रतिक्रिया देताना माजी आमदार विलास लांडे म्हणाले की, हेवा वाटावा अशी आमचे पिताश्री आणि श्रीनिवास पाटील यांच्यातील मैत्री आहे. समाजकारणात वावरुनही आमचे वडील राजकारणापासून चार हात लांब राहिले. त्यामुळे काहीजण विचारतात की, विठोबा लांडेंनी नेमके काय कमविले?, मात्र, श्रीनिवास पाटील यांनी आवर्जून आमच्या पिताश्रींची घेतलेली भेट आणि त्यातून घडलेले निस्वार्थ मैत्रीचे दर्शन हीच खरी त्यांच्या आयुष्यातील कमाई आहे.

भाजप शिवसेना युती होणार ? असा असेल युतीचा फॉर्मूला