एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याचे कळताच त्या मातेनेही सोडले प्राण

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – अपघातात एकुलत्या एक मुलाचा मृत्यू  झाल्याची माहिती जन्मदात्रीला कळताच काही तासांतच तिनेही प्राण सोडून जगाचा निरोप घेतला. दुसरीकडे मुलाचे वडील पुण्यातील खासगी रुग्णालयात दूर्धर आजारशी झुंज देत आहेत. काळीज पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

जालना येथे तालुका क्रीडा अधिकारी असलेले संजय शंकर वणवे (४४, रा. नागेश्वरवाडी, औरंगाबाद) यांच्या आई वत्सला शंकर वणवे (६0) यांना किडनीचा आजार असल्याने त्यांना औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आजारी आईला रुग्णालयात डबा देऊन घरी निघालेल्या संजय वणवे यांच्या दुचाकीला भरधाव इनोव्हा कारने धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले होते. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवारी (दि. १०) सकाळी त्यांचा मृत्यू झाला.

नातेवाइकांनी चार दिवसांपर्यंत संजय यांच्या आई वत्सलाबाई यांना दिली नव्हती. संजय यांच्या मृत्यूनंतर आई-वडिलांना औरंगाबाद येथील रुग्णालयातून त्यांच्या मुलीने पुण्याला हलविण्याचा निर्णय घेतला. मात्र, आईने मुलाला भेटल्याशिवाय पुण्याला जाणार नाही, असा हट्ट धरला तेव्हा नातेवाइकांना अश्रू आवरता आले नाही. काळजावर दगड ठेवून त्यांच्या डॉक्टर असलेल्या जावयाने संजय हा त्यांच्या कार्यालयाच्या कामासाठी मुंबईला गेला आहे, तो सकाळीच पुण्याला येईल.

तुम्ही पुण्याला चला, असे सांगून त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल केले. चार दिवस झाले तरी संजय कसा येत नाही, तो मुंबईत असला तरी मला त्याच्याशी फोनवर बोलू द्या, असा हट्ट धरला. तो आम्हाला सोडून कधीच जात नाही. गेला तर सांगून जातो, त्याने मला फोनही केला नाही. त्याला बोलल्याशिवय मी जेवणार नाही, असे सांगून वत्सलाबाई यांनी अन्न-पाणी त्यागले. शेवटी एका नातेवाइकाने त्यांना संजय अपघातात मरण पावल्याची माहिती दिली. ही माहिती मिळाल्यानंतर शोक अनावर झालेल्या मातेने पाच तासांनंतरच प्राण सोडले.