४५०० रुपयांची लाच घेताना विद्यूत विभागाचा सहायक अभियंता एसीबीच्या जाळ्यात

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन – पथदिव्यांचे काम पूर्ण झाल्याचे सर्टीफिकेट तयार करुन दिल्याबद्दल ४० हजार रुपयांची लाच मागून ४ हजार ५०० रुपयांची लाच स्विकारताना अमरावती जिल्हा परिषद बांधाकाम विभागातील विद्यूत विभागाच्या सहायक अभियंत्याला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई आज (मंगळवार) जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात करण्यात आली.
प्रदिप भाऊरावजी पोफळे (वय-५५) असे अटक करण्यात आलेल्या सहायक अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी २४ वर्षाय व्यक्तीने अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे.

तक्रारदार यांनी ग्राम निजामपुर येथील एलईडी सौर पथदिवे बसवण्याचे काम केले होते. हे काम पूर्ण झाल्याने पोफळे याने कामाचे एम.बी. रेकॉर्ड व सि.सि. सर्टिफिकेट तयार करुन दिले होते. या कामाच्या मोबदल्यात पोफळे याने तक्रारदाराकडे ४० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीमध्ये ४ हजार ५०० रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदाराने याची तक्रार सोमवारी (दि.७) अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता पोफळे याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. आज जिल्हा परिषद येथे सापळा रचून पोफळे याला लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई अमरावती परीक्षेत्राचे पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक, अप्पर पोलीस अधिक्षक पंजाबराव डोंगरदिवे, पोलीस उप अधिक्षक गजानन पडघण, पोलीस निरीक्षक रूपाली पोहनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रूपाली पोहनकर, पोलिस निरीक्षक रविंद्र जेधे, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्योती झाडे, पोलीस शिपायी युवराज राठोड, शैलेश कडू, चालक सहायक पोलीस उपनिरीक्षक सतिश कीटुकले यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.