कोण पार्थ पवार..? मी ओळखत नाही – श्रीरंग बारणे

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – कोण पार्थ पवार..? मी ओळखत नाही. केवळ अजित पवारांचा मुलगा एवढीत त्यांची ओळख आहे. फ्लेक्सवर झळकून त्याला स्वत:ची ओळख सांगावी लागत आहे. कुणीही दुसरा पवार माझ्या विरोधात लढला तरी मला काहीच फरक पडत नाही. मावळचा पुढचा खासदार मीच होणार असा विश्वास श्रीरंग बारणे यांना व्यक्त केला.

पिंपरीत खासदार श्रीरंग बारणेंनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदाप गौतम चाबुकस्वार, शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, शहर संघटक गजानन बाबर, नगरसेवक सचिन भोसले, निलेश बारणे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, युवा नेते जितेंद्र ननावरे, रोमी संधू आदी उपस्थित होते.

लोकसभेच्या निवडणूका तीन ते चार महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. त्याला कारण आहे, अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार.. पार्थ मावळ लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. पार्थ यांची एंट्री होणार असल्याच्या चर्चेने राष्ट्रवादीतील इच्छुकांनी आपल्या तलवारी म्यान केल्यात. तर भाजपकडून रिंगणात उतरण्याच्या तयारीत असलेल्या आमदार लक्ष्मण जगताप यांनी देखील पवारांशी पंगा नको म्हणत, चिंचवड विधानसभेवरच आपले लक्ष केंद्रीत केले असल्याची चर्चा आहे.

खासदार बारणे यांना पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत पत्रकारांनी विचारले असता त्यांनी बिनधास्तपणे प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले की, कोण पार्थ पवार…? मी ओळखत नाही. केवळ अजित पवारांचा मुलगा एवढीच त्यांची ओळख आहे. स्वत:ची ओळख करून देण्यासाठी पार्थ याला फ्लेक्सवर झळकावे लागत आहे. कुणीही दुसरा पवार समोर आला तरी मला काहीच फरक पडत नाही. गेल्या साडेचार वर्षात केलेले काम, आणि केलेल्या विकासकामांच्या जोरावरच मावळचा पुन्हा एकदा खासदार मीच होणार असल्याचा विश्वास श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला.