बायकोला मटण बनवायला झाला उशीर ; नवऱ्याने केली मुलीची हत्या

पाटणा : वृत्तसंस्था-रागाच्या भरात कोण काय करेल हे काही सांगता येत नाही. रागात येऊन अगदी खून केल्याच्या घटनाही आपण ऐकल्या असतील. त्यातही नवरा बायकोच्या भांडणांचे अनेक किस्से अापण ऐकतो. परंतु एकाचा राग दुसऱ्यावर निघतो आणि घडते भलतेच काही. कारण क्षुल्लक असते आणि लहान मुला मुलींवरही पालकडून राग काढला जातो. परंतु ही गोष्ट जर खूनापर्यंत जात असेल तर नक्कीच विचार करायला लावणारी आहे आणि अशा माणसाला नक्की माणूसच म्हणावं का असाही प्रश्न समोर येतो. जे तुम्ही वाचणार आहात ते वाचून नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटेल. चक्क जेवण उशीरा बनवलं म्हणून नवऱ्याने बायकोचा राग मुलीवर काढला.

बायकोने मटण बनवायला उशीर केला एवढ्या एका क्षुल्लक कारणावरून  संतापलेल्या नवऱ्याने पोटच्या चार वर्षाच्या मुलीला बेदम मारहाण केली. धक्कादायक म्हणजे या मारहाणीत मुलीचा मृत्यू झाला आहे. बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील फकीरटोली गावात बुधवारी संध्याकाळी ही धक्कादायक घटना घडली. बिहारची राजधानी पाटण्यापासून ३६० किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. शंभू लाल शर्मा (४०) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

नेमकी घटना काय ?

मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पूर्णिया येथील सादर हॉस्पिटलमध्ये पाठवला आहे. चौकशीमध्ये आरोपीने त्याच्या हातून घडलेल्या या अमानवीय कृत्याबद्दल खेद व्यक्त केला. आरोपी शंभू लाल गुजरातमध्ये मजूर म्हणून काम करतो. छट पूजेसाठी म्हणून तो गावी आला होता. त्याला मटण प्रचंड आवडते. मटण बनवायला उशिर होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याचा पारा चढला. रागाच्या भरात त्याने त्याच्याजवळ खेळत असलेल्या चार वर्षाच्या मुलीला मारहाण सुरु केली. मुलीचा आवाज येणे बंद झाल्यानंतर त्याने मारहाण थांबवली. आपल्या कृत्यामुळे मुलगी बेशुद्ध पडल्याचे त्याच्या लक्षात आले.

त्याने लगेच मुलीला जवळच्या रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी तपासल्यानंतर मुलीला मृत घोषित केले. त्याने मुलीचा मृतदेह रुग्णालयातच सोडून तिथून पळ काढला. नंतर पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपी पत्नीलाही मारहाण करायचा असे स्थानिकांनी पोलिसांना सांगितले.