तक्रारदार महिलेस ठाणे अंमलदारानेच केली मारहाण

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – बांधकामासाठी दुसरीकडून विटा मागितल्याच्या कारणावरून विटांचा पुरवठा करणाऱ्या दलालाने दोन महिलांना मारहाण केली. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे. याची माहिती घेण्यासाठी आलेल्या तक्रारदार महिलेस ठाणे अंमलदाराकडून अरेरावी करून मारहाण करण्यात आली. हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये चित्रित करण्यात आला आहे.

वाळूज औद्योगिक क्षेत्रातील जोगेश्वरी शिवारातील भुजंगवस्तीत येणाऱ्या शिवशक्तीनगर येथील रहिवासी बांधकाम ठेकेदार नंदकिशोर तिकटे पत्नी सरला, मुलगी व मुलासह वास्तव्यास आहेत. येथील गट नं.९३ मध्ये गणेश ठाकूर यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने ठेकेदार तिकटे यांनी सुरुवातीला अमोल डहाळे या दलालाच्या मदतीने तीन हजार विटांची ऑर्डर दिली होती. त्याने तीन हजार ऐवजी दीड हजार विटा देण्याची मनधरणी करून तीन हजार विटांच्या २८ हजार ५०० रुपयांची मागणी केली.

दरम्यान, तिकटे यांनी तीन हजार विटा द्या अन्यथा गाडी खाली करू नका, असे म्हणताच दलाल डहाळे हा गाडीसह निघून गेला होता. त्यानंतर तिकटे यांनी वीटभट्टी मालक वाघचौरे यांच्याशी संपर्क साधून तीन हजार विटांची मागणी केली असता विटा देण्याचे त्यांनी सांगितले. यानंतर अमोल डहाळे याने तिकटे यांना संपर्क साधून इतर ठिकाणी फोन करण्यास मज्जाव करत बांधकाम बंद करण्याची धमकी दिली. त्यानंतर सात ते आठ जणांसह बांधकामाच्या ठिकाणी येऊन वाघचौरे यांना फोन का लावला, असे म्हणत धमकी देत तिकटे यांच्या पत्नी सरला आणि त्यांची जाऊ यांना मारहाण केली. त्यावेळी नागरिकांनी मध्यस्ती करत प्रकरण मिटविले. मात्र पुन्हा एक जण परत येऊन तिकटे यांना येथेच थांबा मी पुन्हा येतो, अशी धमकी देत निघून गेला. त्यानंतर घाबरलेल्या तिकटे कुटुंबीयांनी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. तिकटे यांच्या पत्नी पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीस अटक का केली नाही, याबाबत विचारपूस केली असता ठाणे अंमलदार सहायक फौजदार नामदेव सुरडकर यांनी त्यांना धमकावत मारहाण करून ठाण्याबाहेर काढले.

हा सर्व प्रकार फिर्यादीने आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला आहे. पोलिसांच्या या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त करत आहेत. यासंदर्भात पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांना संपर्क साधला असता ते म्हणाले, पोलीस ठाण्यात महिलेस पोलिसांकडून मारहाण झाली असेल तर ते चुकीचेच आहे. असे झाले असल्यास प्रकरणाची चौकशी केली जाईल. सदर महिला ठाण्यात धिंगाणा घालून अधिकारी व कर्मचाऱ्यांबद्दल चुकीची भाषा वापरत होती म्हणून तिला बाहेर बसविण्यास सांगण्यात आले.