डॉक्टर नसताना रुग्णवाहिकेतच महिलेची प्रसूती

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी जात असलेल्या रुग्णवाहिकेतच विना डॉक्टर महिलेची प्रसूती झाल्याची घटना समोर आली आहे. कुंभारखेडा येथून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी ही रुग्णवाहिका जात होती. त्यावेळी ही घटना घडली. सुदैवाने यावेळी रुग्णवाहिका रुग्णालयात पोहचल्याने बाळासह आईला वेळीच उपचारासाठी दाखल करण्यात आले. या आईने मुलीला जन्म दिला असून आई आणि बाळ दोघेही सुखरुप आहेत अशी माहिती मिळाली आहे.

उषाबाई तेजमल राठोड (वय 19) असं या आईंच नाव आहे. जामनेर तालुक्यातील कुंभारखेडा येथील त्या रहिवासी आहेत. उषाबाई राठोड या विवाहीतेला 7 महिन्यांचा काळ पूर्ण झाला होता. उषाताई यांना गुरुवारी सकाळी अचानक प्रसूती कळा सुरू झाल्या. त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ वाकोद येथील प्राथमिक रुग्णालयात दाखल केले. परंतु प्रसाधनासाठी अडचण येत असल्याचं डाॅक्टरांनी सांगितलं. शिवाय उषाबाई यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांना तात्काळ जिल्ह्या रुग्णालयासाठी रुग्णवाहिकेतून रवाना करण्यात आले. रुग्णवाहिकेतून जात असताना सोबत उषाबाई हिची सासू भुलीबाई ज्ञानसिंग राठोड तसेच मावस सासू अनुषाबाई राठोड होत्या. दरम्यान रुग्णवाहिकेतच उषाबाई यांची विना डाॅक्टर प्रसूती झाली. या रुग्णवाहिकेच्या (एम.एच 13 ची ) चालकाचे नाव विजय पांढरे आहे.

सुदैवाने रुग्णवाहिका रुग्णालयात वेळेवर पोहचली

उषाबाई यांना प्रसूती कळा सुरू झाल्याने लवकरात लवकर जिल्हा रुग्णालयात पोहोचणे गरजेचे होते. लवकरात लवकर जिल्हा रुग्णालयात पोहचण्यासाठी चालक पांढरे यांची कसरत सुरु होती. मोठ्या कसरतीने जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशव्दाराजवळ पांढरे यांनी रुग्णवाहिका आणली. प्रवेशव्दाराजवळ रुग्णवाहिका पोहचताच कळा असह्य झालेल्या उषाबाई यांची प्रसूती होवून मुलगी जन्माला आली. यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान यानंतर दोघांची प्रकृती सुखरुप असल्याची माहिती समोर आली.