दुष्काळाचा बळी; टँकरमधून पाणी भरायला गेली आणि जीव गमावून बसली 

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य सरकारने २६ जिल्ह्यातील १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांची स्थिती तर फारच बिकट आहे. औरंगाबादेत दुष्काळाचा बळी गेला आहे. घोटभर पाण्याकरिता नागरिकांची ससेहोलपट सुरु आहे. फुलंब्री तालुक्यातील निमखेडा येथील गेवराई शिवारातील असलेल्या जोशीवाडी वस्तीमध्ये एका महिलेचा पाण्याच्या टँकरखाली दबून मृत्यू झाला आहे. सुनिता हटकर असे या २५ वर्षीय महिलेचे नाव आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, जोशीवाडी वस्ती येथे दुष्काळी परिस्थिती असल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय. येथे शासनाने अधिग्रहीत केलेल्या विहिरीवरुन टँकरने पाणी भरुन ते नागरिकांना पुरवले जाते आहे. परिसरातील हात पंप गेल्या ४ महिन्यांपासून बंद असून विहिरी आटल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना थेंब-थेंब पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

टँकरमधून गळणारे पाणी भरायला गेली आणि जीव गमावून बसली
शुक्रवारी दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान शासनाने अधिग्रहित केलेल्या विहिरीवर टँकरमध्ये पाणी भरण्यात येत होते. दरम्यान, सुनिता या टँकरमधून गळणारे पाणी भरण्यासाठी टँकर जवळ गेल्या. मात्र, टँकरचे चाक चिखलात रुतलेले असल्याने टँकर पलटी झाला. या टँकरखाली सुनीता दबल्या गेल्या. यानंतर सुनिता यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. दुष्काळी परिस्थिती असताना नागरिकांची पाण्यासाठी ससेहोलपट होत आहे. त्यामुळे येणारे ६ महिने पाण्यावाचून पुढे ढकलायचे कसे? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्याचा विचार करता औरंगाबाद, गंगापूर, खुलताबाद, पैठण, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, विजापूर, कन्नड तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.