पोलीस अधिकाऱ्याला फेसबूकवरील मैत्री महागात, महिलेने घातला लाखोंचा गंडा

फरीदाबाद : वृत्तसंस्था – सोशल मीडिया जसे चांगले आहे तसे धोकादायक देखील आहे. सोशल मीडिया हे माध्यम विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी असले तरी या माध्यमाचा दुरउपयोग होता दिसून येत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांची फसवणूक केल्याचा घडना घडल्या आहेत आणि घडतही आहेत. अशीच एक घटना फरीदाबाद येथे घडली आहे. या घटनेत एका फेसबुकवरील मैत्रीणीने चक्क पोलिसालाच लाखोंचा गंडा घातल्याचे समोर आले आहे.

लंडनमध्ये राहत असल्याचा दावा करणाऱ्या या महिलेने सुरुवातील फेसबूकवरून पोलिसाशी मैत्री केली. त्यानंतर मैत्री आणि विविध अडचणींचा पाढा वाचत त्याच्याकडून तीन लाख रुपये उकळले. मात्र या महिलेचा फोन अचानक बंद झाल्याने फसवणूक झाल्याचा संशय आल्यानंतर संबंधित पोलिसाने या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अमित कुमार असे फसवणूक झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. ते पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात नियुक्तीवर आहेत. गतवर्षी जानेवारी महिन्यात माझी फेसबूकवरून लंडनमधील शैली ब्राऊन नावाच्या महिलेशी मैत्री झाली होती. मी मेसेंजरवरून तिच्याशी सातत्याने चॅटिंग करत असत. त्यानंतर काही काळाने शैलीने माझा व्हॉट्सअॅप नंबर मिळवला. त्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी आपण भारतात येत असल्याचे तिने सांगितले. त्यानंतर प्रिया चंगोली नावाच्या एका महिलेने मला फोन करून शैली भारतात पोहोचल्याचे सांगितले. तिने आपल्यासोबत दीड लाख पौड्सचा ड्राफ्ट आणला असून, ती रक्कम भारतीय चलनामध्ये परिवर्तित करून घेण्यासाठी काही रुपयांची गरज असल्याचे सांगत पैशांची मागणी केली. त्यानंतर मी ३५ हजार रुपये तिने सांगिललेल्या खात्यात जमा केले, असे अमित कुमार यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

त्यानंतर या ड्राफ्टच्या मोबदल्यात आरबीआयकडून खात्यात एक कोटी ३५ लाख ९५ हजार ८०० रुपये जमा होतील असे प्रिया नामक महिलेने त्यांना सांगितले. तसेच या रकमेची आमिष दाखवून विविध खात्यांमध्ये त्यांच्याकडून तीन लाख रुपये जमा करून घेतले. त्यानंतर आरोपी सातत्याने पैसे पाठवण्यासाठी तगादा लावू लागले. मात्र आता अमित यांना त्यांच्यावर संशय आला. तसेच त्यांनी त्यांना प्रत्यक्ष भेटायची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर मात्र या सर्व आरोपींचे फोन बंद झाले. अखेरीस आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अमित यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. दरम्यान, पोलिसांनी तक्रार मिळाल्यानंतर तिची छाननी केली असून, तक्रार खरी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तपासास सुरुवात केली आहे.