रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन वैरागमध्ये महिलेचा खून 

वैराग : पोलीसनामा ऑनलाईन: वैराग येथे पंचशील नगर मध्ये राहणाऱ्या विवाहित क्रांती अश्रूबा दराडे (रा. सारोळा, ता. वाशी, जि. उस्मानाबाद, सध्या रा. पंचशीलनगर, वैराग) यांचा मध्यरात्री अज्ञातांनी धारधार शास्त्राने खून केला असून मयत क्रांती यांच्या आई राधाबाई पुंडलिक मुंडे यांनी अज्ञाताच्या विरोधात वैराग पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.

क्रांती यांचे अश्रुबा दगडे यांच्या सोबत लग्न झाले असून त्यांना  अश्‍विनी (वय १३), अपेक्षा (वय११), अविनाश (वय ७) व आविष्कार (वय ४) अशी चार आपत्य आहेत. पती पत्नींची भांडणे होत असल्याने क्रांती आपल्या मुलांसहित एप्रिल आणि मे  महिन्यात आपल्या माहेरी ताडगाव येथे राहायला गेल्या त्यानंतर मागील सात महिन्यापासून त्या वैरागच्या पंचशील नगर येथे स्वतंत्रपणे आपल्या मुलांना घेऊन भाडोत्री खोलीत राहू लागल्या होत्या.

क्रांती काम करून आपल्या मुलांचा सांभाळ करत होत्या. गुरुवारच्या रात्री नेहमी प्रमाणे त्यांनी आपल्या मुलांना जेवण बनवून खाऊ घातले आणि त्यानंतर त्यांनी आपल्या मुलांना झोपवले आणि त्यानंतर मध्यरात्री नेमके काय झाले हे कोणालाच कळले नाही. क्रांती यांच्या अकरा वर्षाच्या मुलीने आपल्या आज्जीला फोन लावून आपल्या आईचा खून झाला आहे असे सांगितले आणि त्यानंतर मृत महिलेची आई राधाबाई पुंडलिक मुंडे या ताडगाव वरून निघून वैरागला आल्या त्यानंतर त्यांनी वैराग पोलीसात आपल्या मुलीच्या हत्येची वर्दी दिली. वर्दी मिळताच क्षणार्धात पोलीस घटना स्थळी दाखल झाले आणि त्यानंतर पोलिसांनी तपास कार्यास आरंभ केला.

मयत महिलेची अकरा वर्षीय मुलगी अपेक्षा हिने पोलिसांना दिलेल्या माहिती नुसार गुरुवारी रात्री आठच्या सुमारास दोन १८ ते २० वयाच्या दरम्यानची मुले घरी आली होती. त्यानंतर दहाच्या सुमारास  आम्ही जेवण करून झोपलो त्यानंतर पहाटे साडे तीनच्या सुमारास जाग आली असता आपली आई रक्ताने माखलेली दिसली असे मयत महिलेची मुलगी म्हणाली आहे. तर मयत महिलेचे शवविच्छेदन वैराग प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले आहे. मयत महिलेच्या गळ्यावर, मानेवर हातावर, पाठीवर, दंडावर असे तेरा ठिकाणी वार करण्यात आले आहेत अशी प्राथमिक पाहणीतून लक्षात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. वैराग येथील खूनाचा तपास  पोलिस निरीक्षक सुधाकर कोरे यांच्या कडे देण्यात आला असून महिलेच्या खूनाचा अद्याप कसलाही तपास लागला नाही. या खूनाने वैराग भागात घबराहट पसरली असून लोकांनी खूना बद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.