येरवड्यात गोळीबाराचा थरार ; वर्दळीच्या ठिकाणी एकाचा सपासप वार करून खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोल्फक्लब चौक ते आंबेडकर चौका दरम्यान एका युवकावर वार करुन गोळ्या झाडून खून केल्याचा प्रकार आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडला आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

संदीप सुभाष देवकर (वय- ४५ रा. खडकी गावठाण) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

संदीप देवकर याच्यावर अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने वार करुन दोन गोळ्या झाडल्या. यामध्ये गंभीर जखमी होऊन संदीप देवकर याचा मृत्यू झाला. येरवडा येथील गोल्फक्लब चौक ते आंबेडकर चौकादरम्यान एका युवकावर वार करण्यात आले असल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचे काम सुरु आहे.