झुडपात सापडला तरुणीचा मृतदेह, परिसरात खळबळ

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – नागपुरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राऊत नगरमध्ये एका मोकळ्या जागेतील झुडूपात तरुणीचा मृतदेह सापडल्यामुळे या परिसरात एकच खळबळ माजली आहे. २५ ते ३० वयोगटातील तरुणीचा हा मृतदेह आहे. या तरुणीची गळा चिरून हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास काही नागरिकांना झुडुपात तरुणीचा मृतदेह दिसला. त्यानंतर लगेचच नागरिकांनी याबाबतची माहिती नंदवन पोलिसांना देण्यात आली त्यानंतर लगेचच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा या तरुणीची गळा चिरून हत्या करण्यात आल्याचे समोर आले.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांनी मृत तरुणीच्या संदर्भात संपूर्ण परिसरात चौकशी केली असता, ती तरुणी त्या परिसरातील नसल्याचे समोर आले आहे. अगदी रस्त्या शेजारी असलेल्या भूखंडावर मृतदेह आढळून आला असल्याने तिची हत्या अन्य कुठे केल्यानंतर मृतदेह त्या ठिकाणी फेकून आरोपीने पोबारा केला असावा, असा संशय पोलिसांना आहे. या शिवाय तरुणीच्या कपड्यांवरून ती नागपूर किंवा शेजारच्या भागातील नसावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तरुणीची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी तिचे फोटो इतर पोलीस ठाण्यांना पाठवले आहेत.