जानेवारीपासून एटीएम कार्ड बंद होणार : आरबीआय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज प्रत्येक माणसाचे बँकेत खाते आहे. इतकेच नाही तर सर्वांकडे एटीएम कार्डदेखील आहे. बऱ्याच लोकांना हे माहीत असेल किंवा नसेलही की आपण वापरत असलेल्या प्रत्येक एटीएम कार्डला मॅग्नेटिक स्ट्राईप असते. जर तुम्ही जुने मॅग्नेटिक स्ट्राईप कार्ड 31 डिसेंबरपर्यंत EMV कार्डमध्ये बदलून घेतले नाही तर 1 जानेवारीपासून एटीएम कार्ड बंद होणार आहे. आता  जुनं मॅग्नेटिक स्ट्राईप कार्ड हे सुरक्षेच्या दृष्टीनं योग्य नाही अशी माहिती समोर आली आहे. यामुळे रिजर्व बॅंक ऑफ इंडियाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे रिजर्व बॅंकेनं 2015 मध्येच जुने एटीएम, डेबिट कार्ड EMV मध्ये बदलून घेण्याचे आवाहन केले होते. सध्या  एटीएम कार्डवरून होणारी फसवाफसवी आणि गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यामुळे ग्राहकांच्या सरक्षेसाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे.
EMV कार्ड नक्की आहे तरी काय?
EMV कार्डला कोणतीही मॅग्नेटिक स्ट्राईप नसते. EMV स्मार्ट पेमेंट कार्ड असतात. ज्यामध्ये मॅग्नेटिक स्ट्राईप्सचा उपयोग न करता इंटिग्रेटेड सर्किटमध्ये डेटा स्टोअर केला जातो. इतकेच नाही तर या कार्डने जेवढ्या वेळेस व्यवहार केला जाईल, तेवढ्या वेळेस डायनामिक डेटा तयार केला जातो.  या कार्डला चिप कार्ड आणि आयसी कार्ड असंही म्हणलं जातं. विशेष म्हणजे  या कार्डचे डुप्लीकेट कार्ड बनवता येणार नाही, आणि कोणी कॉपीही करु शकणार नाही.  त्यामुळे एटीएम कार्डसंबंधी गुन्हेगारीला चांगलाच आळा बसणार असून आता त्यांच्या सुरक्षेत वाढ होणार आहे.  या कार्डचा मोठा फायदा ग्राहकांना होणार आहे.
असे आेळखा  EMV कार्ड
सर्वात आधी तुम्ही तुमच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या उजव्या बाजूला EMV चिप आहे की नाही हे पाहावं लागेल. याद्वारे तुम्ही सहज पाहू शकता की, तुमचं कार्ड ब्लाॅक होणार आहे किंवा नाही ते. सर्वप्रथम तुम्ही कार्डची चिप तपासून पहा. एक साधी गोष्ट आहे.  जर कार्डच्या उजव्या बाजूला त्यावर सिमकार्ड सारखी चिप असेल, तर कार्ड ब्लॉक होणार नाही. तसेच अशी चिप नसल्यास कार्ड जुनं असून, ते कार्ड 31 डिसेंबरपर्यंत ब्लॉक होणार आहे हे मात्र लक्षात ठेवावं.
कसे मिळवाल  EMV कार्ड ?
तुम्ही तुमचे कार्ड बदलून घेण्यासाठी संंबंधित बॅंकाच्या शाखेत संपर्क करायचा आहे. याशिवाय  इंटरनेट बॅंकिंगच्या सहाह्याने EMV कार्ड मिळवता येणे शक्य आहे. इतकेच नाही तर कार्ड मिळवण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमचे  EMV कार्ड घरपोच मिळणार आहे. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.