नैराश्येतून मुलाची आईच्या चितेजवळ आत्महत्या

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन – आईचा विरह सहन न झाल्याने मुलाने आईच्या चितेजवळ आत्महत्या केली. मुलाने स्कॉर्पिओ गाडीत बंद करुन पेटवून घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार लातूर जिल्ह्यात घडला आहे. हा प्रकार लातूर जिल्ह्यातील शिरुर ताजबंद शिवारात काल (रविवार) रात्री साठे आठच्या सुमारास घडला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

गजानन कोडलवाडे असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. गजानन कोडलवाडे याच्या आईचा तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. त्यानंतर शेतात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तीन दिवसांनंतर स्कॉर्पिओतून त्याच ठिकाणी जाऊन मुलानंही आत्महत्या केली आहे. गजानननं काल रात्री आईच्या चितेजवळ स्कॉर्पिओ गाडी नेली, त्यानंतर गाडीवर डिझेल टाकून पेटवून घेतले. विशेष म्हणजे त्यानं स्वतःला गाडीत बंद केले आणि मग गाडी पेटवून दिली.

या प्रकारानंतर अहमदपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गजानन याची दोन लग्नं झाली होती. कौटुंबिक वाद वाढत असतानाच आईचा मृत्यू झाल्यानं गजानन नैराश्येच्या गर्तेत अडकला आणि त्यानं आत्महत्येचा मार्ग पत्करला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.