मोबाईल घ्यायला नकार दिल्याने तरुणाची आत्महत्या

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – आईने मोबाईल घेण्यास नकार दिल्याच्या कारणावरून २३ वर्षीय तरुणाने रागाच्या भरात स्वत:ला रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची घक्कादायक घटना जळगावात घडली आहे. सोमवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ माजली आहे. सुमेध काकासाहेब भालेराव असे या २३ वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे.
सुमेधजवळ आधीपासूनच दोन मोबाइल होते. तरीही त्याने आईजवळ आणखी एक मोबाइलचा हट्ट धरला होता. यावरून दोघांमध्ये भांडण झाले. त्यानंतर तो रागातच दुचाकीने घराबाहेर पडला. रात्री ११ वाजता दुचाकी शिव कॉलनी पुलाजवळील रेल्वे रुळांसमोर उभी करून त्याने धावत्या रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या केली.
मोबाईलला लावला होता इअरफोन 
तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती रेल्वेच्या लोको पायलटने रेल्वे अधिकाऱ्यांना कळवली होती. त्यानंतर पोलिसांनी छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह रुग्णालयात आणला होता. घटनास्थळी पाहणी केल्यानंतर सुमेधची दुचाकी रेल्वे रुळांशेजारी असलेल्या रस्त्यावर उभी असल्याचे दिसून आली. या दुचाकीच्या क्रमांकावरून माहिती मिळवली. मंगळवारी सकाळी सुमेधच्या मित्रांनी मृतदेहाची ओळख पटवली. सुमेधचे वडील मुंबईत राहतात.आत्महत्येच्या वेळी सुमेधच्या एका मोबाइलला इअरफोन लावलेला होता. आत्महत्या करण्यापूर्वी तो मोबाइलवरून कोणाशी तरी बोलत असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.