पोलिसांदेखत न्यायालयाच्या आवारातून तरुणाचे अपहरण

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – न्यायालयीन कामकाजासाठी आलेल्या तरुणाचे न्यायालयाच्या परिसरातून अपहरण केल्याची घटना आज दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे तरुणाला नेत असताना न्यायालयातील पोलीस चौकितील पोलिसांनी आडवले असता त्याला दवाखान्यात नेत असल्याचे सांगून तरुणाला पोलिसांदेखत गाडीत घालून घेऊन गेले. या प्रकारामुळे न्यायालयात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता तरुणाला न्यायालयाच्या आवारात मारहाण करतानाची दृष्य कॅमेऱ्याद कैद झाले आहेत.

समतानगरातील रहिवासी गोपाळ रामदास साळुंखे (वय ३५) व प्रदीप संतोष सपकाळे हे दोघेही न्यायालयात कामकाजाच्या तारखेवर आलेले होते. न्यायालय आवारात दुपारी साडेतीनच्या सुमारास आठ ते दहा तरुणांच्या टोळक्‍याने येऊन या तरुणांना काही एक कारण नसताना मारहाण करण्यास सुरवात केली.

गोपाळ साळुंखे या तरुणास झायलो कारमधून नेत बेदम मारहाण करून नंतर सायंकाळी सागर पार्कवर टाकून देत आरोपी निघून गेले. दरम्यान, या प्रकाराची पोलिसांनी दखल घेत सहाय्यक निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी जखमी तरुणाची तक्रार घेण्यासाठी भेट घेतली. मात्र, जखमी बेशुद्धावस्थेत असल्याने माहिती कळू शकली नाही.

दुपारी साडेतीनच्या सुमारास, न्यायालय आवारातून गोपाळ साळुंखे यांना शैलेश ठाकरे, मोगली ऊर्फ रवी ठाकरे, राहुल ठाकरे यांनी मारहाण करून उचलून नेले. कोर्टातील चौकीच्या पोलिसांनी विचारणा केल्यावर, त्याला दवाखान्यात नेतो, असे सांगत झायलो कारमधून (एमएच १९, ४५४५) नेण्यात आल्याचे चौकीतील पोलिसांना विचारणा केल्यावर त्यांनी सांगितले. शहर पोलिसांत याबाबत लेखी तक्रार दिली असून, ‘सीसीटीव्ही’त मारहाण करणाऱ्यांचे शूटिंग झाली असल्याचे जखमीच्या नातेवाईकांनी सांगितले.

जखमी तरुणाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला गाडीत गावठी रिव्हॉल्व्हर लावून मारहाण सुरू होती, तसेच एकाने कानातच चॉपर लावून धरले. जखमी गोपाळ याला सोडून दिल्यानंतर त्याने घरच्यांना फोन करुन घटनेची माहिती दिली. घरच्यांनी त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असून त्या धावत्या वाहनातच बेदम मारहाण करण्यात आल्याची त्रोटक माहिती तो देत असल्याचे घरच्यांनी सांगितले.