पुण्यात पद्मावती परिसरात तरुणाचा खुन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पत्नीला शिवीगाळ का करतो, या कारणावरुन झालेल्या वादात तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करुन तिघांनी त्याचा खुन केल्याची घटना पद्मावती येथील वीर लहुजी सोसायटीत बुधवारी रात्री घडली. मोहन शिवाजी गायकवाड (वय २८, रा. वीर लहुजी सोसायटी, पद्मावती) असे खुन झालेल्याचे नाव आहे.

हे ही वाचा – पुण्यात भीषण आग ; दुकाने जळाली 

याप्रकरणी पोलिसांनी राकेश तुळशीराम पाटोळे, तुळशीराम पाटोळे आणि गणेश वैराट (सर्व रा. वीर लहुजी सोसायटी, पद्मावती) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, मोहन गायकवाड व तीनही आरोपी हे वीर लहुजी सोसायटीत शेजारी शेजारी रहातात. ते सर्व जण दोन दिवसांपूर्वी कोल्हापूरला गेले होते. तेथे त्यांच्यात काही वाद झाला होता. तेथून सर्व जण बुधवारी सकाळी परत आले. त्यानंतर सायंकाळी मोहन गायकवाड हा सोसायटीत उभा असताना राकेश, त्याचे वडिल तुळशीराम पाटोळे आणि गणेश वैराट तेथे आले. तेव्हा राकेश पाटोळे याने माझ्या पत्नीला तु काय म्हणाला, तिला शिवीगाळ का करतो, असे विचारले. यावरुन त्यांच्यात वादावादी झाली. तेव्हा तिघांनी मिळून मोहनला बेदम मारहाण केली. राकेशने लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यात वार केला. मोहन रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर तिघेही पळून गेले. तेथील नागरिकांनी मोहनला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, उपचार सुरु असताना पहाटे २ वाजता त्याचा मृत्यु झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त बच्चनसिंग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी घटनास्थळाला भेट दिली.  पोलिसांनी तुळशीराम पाटोळे यांना ताब्यात घेतले असून अन्य दोघांचा शोध घेण्यात येत आहे.